मुंबईत 20 डेंजर पॉइंट, दरडींसाठी जिल्हाधिकारी, ‘म्हाडा’ला पालिका ‘सुरक्षा आराखडा’ देणार!

मुंबईत धोकादायक 291 दरडींच्या ठिकाणांमधील अतिधोकादायक 20 ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी पालिका जिल्हाधिकारी, ‘म्हाडा’ला ‘सुरक्षेचा आराखडा’ देणार आहे. यासाठी ‘आयआयटी’सारख्या संस्थांची ऑडिटसाठी मदत घेतली जाणार आहे. पालिकेच्या ‘सुरक्षा आराखडय़ा’नुसार धोकादायक दरडींच्या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये रहिवाशांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून दरडींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. मात्र सर्वाधिक धोकादायक दरडी या ‘म्हाडा’, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारच्या जमिनीवर असल्याने पालिकेला सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात अडथळे येत आहेत. यामध्ये अतिधोकादायक आढळलेली 20 ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुचवणार असून त्यावर संबंधित मालकी असलेल्या प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

अशा करणार उपाययोजना

अतिधोकादायक आढळलेल्या 20 ठिकाणांचे पालिका आणि तज्ञ संस्था, व्यक्तींकडून ऑडिट केले जाणार आहे. यानुसार काही ठिकाणी गरजेनुसार संरक्षण भिंती बांधण्याच्या सूचना केल्या जातील. तर काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येतील. रहिवाशांना गंभीर धोका असलेल्या काही घरांमधील रहिवाशांचे तात्पुरते अथवा गरजेनुसार कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याच्या सूचना देण्यात येतील. विशेषतः तांत्रिकदृष्टय़ा अभ्यास करून अद्ययावत उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.

पालिकेत जोरबैठका, ‘मिड मान्सून’मध्येही आढावा

दरडींच्या सुरक्षेबाबत पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत वारंवार बैठका घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. यानुसार पालिकेच्या ‘मिड मान्सून’ आढावा बैठकीतही विविध यंत्रणांनी सहभागी होऊन चर्चा केली. यानुसार दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने आणि वेगाने करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांच्यासह मुंबईतील संबंधित सर्व प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या