मणिपूरमध्ये कुकी गटानं लष्करी जवानासह 20 जणांना ओलीस ठेवलं, मुख्यमंत्र्यांकडून सुटकेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मणिपूरमधील जनजीवन अद्यापही पूर्वपदावर आलेले नाही. कुकी-मैतेई समाजामध्ये अधूनमधून हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. आताही असाच एक प्रकार उखरूल जिल्ह्यामध्ये घडला आहे. उखरुल जिल्ह्यातील लिटन पोलीस स्टेशनच्या हद्दीत उखरुल-इम्फाळ रोडवर कुकी गटाने एका लष्करी जवानासह 20 जणांना ओलीस ठेवले आहे. संबंधित जवान सुट्टीवर असताना त्या मार्गावरून जात असताना ही घटना घडली. यानंतर मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी सर्वांची सुखरूप सुटका करण्याचे आवाहन केले आहे. ‘द प्रिंट‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

उखरुल जिल्ह्यात नागा आणि कुकी समुदायात झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नागा समुदायाकडून विनाकारण गोळीबार करण्यात येत होता आणि त्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ने दिली.

नागा गटाने आमच्या लोकांवर गोळीबार केला आणि दोन जणांना ओलीस ठेवले. थवाई कुकी गावात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर NSCN-IM च्या सशस्त्र लोकांनी गोळीबार केल्याचा दावा कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ने केला आहे. तर दुसरीकडे मणिपूर पोलिसांनी या घटनेला दोन समुदायांमधील संघर्ष म्हटले आहे.

मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी अधिकृत निवेदन जारी करून यावर चिंता व्यक्त केली आहे. ओलीस ठेवलेल्या 20 जणांची बिनशर्त आणि सुखरुप सुटका करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या भ्याड कृत्यात सामील असलेल्या दोषींना पकडण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी म्हटले.

कुकी समाजाच्या पुरुषांचे मृतदेह सापडले

दरम्यान, मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात गुरुवारी दोन कुकी पुरुषांचे मृतदेह एका वनक्षेत्रात सापडले आहेत. हे दोन्ही व्यक्ती बुधवारपासून बेपत्ता होते अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. थेंगिन बैते (वय – 42), रा. थवाई कुकी गाव, जि. कामजोंग) आणि थांगबोईमांग खोंगसाई (वय – 35, रा. शांगकाई गाव, जि. उखरुल) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मृतदेह कामजोंग जिल्ह्यातील थवाई कुकी गावाच्या जंगल परिसरात आढळून आले आहेत. यामुळे कुकी समाजात संतापाची लाट उसळली आहे.