बोगस डॉक्टरच्या इलाजामुळे २० जणांना एडसची लागण

सामना ऑनलाईन, कानपूर

अक्षरओळख असलेल्या लोकांनाही हल्ली बोगस डॉक्टर कडून इलाज करवून घेतल्यास त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना असते मात्र उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ गावात २० असे लोकं आहेत ज्यांना त्यांचं अज्ञान किंवा दुर्लक्ष जीवावर बेतणारं ठरलं आहे. या सगळ्यांनी सायकलवरून फिरत उपचार करणाऱ्या एका डॉक्टरकडून इलाज करवून घेतला. या बोगस डॉक्टरमुळे या सगळ्यांना एडसची लागण झाली आहे. या सगळ्यांची प्राथमिक तपासणी झाली असून त्यात एडसची लक्षणं दिसून आली आहेत. सखोल चाचणीमध्ये ही लागण किती गंभीर आहे हे कळू शकेल

नोव्हेंबर २०१७मध्ये बांगरमऊ इथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे झालेल्या तपासणी एकाचवेळी २० जणांना एडसची लागण झाल्याचं कळाल्याने एकच खळबळ उडाली होती. जिल्हा रुग्णालयात पाठवल्यानंतर त्यांना एडस झाल्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली. एडस कसा झाला हे शोधण्याचं काम सुरू झालं तेव्हा कळालं की एका बोगस डॉक्टरने एकच इंजेक्शन वारंवार वापरत लोकांवर इलाज केले होते. यामुळेच या सगळ्यांना एडसची लागण झाली.

एडसची लागण झालेले आत्ता २० जण सापडले असले तरी शंका आहे की कमीतकमी ४० जणांना याची लागण झालेली आहे, ज्यात किमाल ४ लहान मुलांचाही समावेश आहे. या वृत्तामुळे बांगरमऊ गावात सध्या भयंकर चिंतेचं वातावरण आहे. ज्या बोगस डॉक्टरमुळे या सगळ्यांना एडसची लागण झाली त्याचा शोध घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय.