एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात

11

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरातील आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन मनपाच्या मुख्य जलवाहिनीतून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यात भ्रष्टाचार होऊ नये, त्यासाठी टँकरला जीपीएस प्रणाली बसविण्याच्या सूचनाही यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या.

महापालिका प्रशासन जागा उपलब्ध होईल तिथे खड्डे खोदून पीट कंपोस्टिंगद्वारे कचऱ्याची विल्हेवाट करीत आहे. पावसाळ्यात हे पीट कंपोस्टिंग शहरासाठी घातक ठरणारे आहे. जमिनीत पुरला जाणारा हा कचरा वेळेवर उचलला गेला नाही तर यामुळे संबंधित परिसरातील बोअरवेलचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण होण्याची संभावना नगरसेवक त्र्यंबक तुपे, अ‍ॅड. माधुरी अदवंत, रावसाहेब आम्ले, राजू वैद्य यांनी व्यक्त केला. तसेच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नगरसेविकांनी हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी तब्बल ६ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे महापौर घोडेले यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब नगरसेवकांनी सभागृहात मांडली. त्यावर महापौर घोडेले यांनी ज्या-ज्या भागातून दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत, तेथील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना दिले. तसेच पाण्याच्या टाक्यांच्या बाजूला कचऱ्याचे पीट कंपोस्टिंग केले जात असेल तर तेथील बोअरवेलच्या पाण्याचेही नमुने तपासून अहवाल सादर करण्याचे महापौरांनी आदेशित केले.

दरम्यान, मयूर पार्क वॉर्डातील सिमेंट रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने या वॉर्डात नवीन पाईपलाईन टाकण्याचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आले होते. या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी शहरातील बहुतेक वॉर्डांत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वॉर्डातील पाईपलाईनचे अंदाजपत्रक मंजूर करावे, अशी मागणी केली. सभागृहाची भावना लक्षात घेऊन महापौर घोडेले यांनी आतापर्यंत प्रलंबित असलेले सर्व पाईपलाईनचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले. तसेच हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या