जिल्ह्यात वर्षभरात शटलच्या केल्या २० हजार बसफेऱ्या रद्द

19

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या शटल बससेवेचे आगारप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी बारा वाजविले आहेत. मनमानी पद्धतीने फेऱ्या सोडताना अधिकाऱ्यांनी वर्षभरात शटल बसच्या तब्बल २० हजार फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये पैठण आगार ‘अव्वल’ ठरला असून, या आगाराने ३ हजार फेऱ्या रद्द करण्याचा ‘पराक्रम’ केला आहे.

काळीपिवळी आणि खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत असल्याने महामंडळाच्या लाखो रुपयांच्या उत्पन्नावर संक्रांत आली होती. या अवैध प्रवासी वाहतुकीचे कंबरडे मोडण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शटल बससेवा सुरू केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून शहरासाठी आणि प्रवासी संख्या जादा असलेल्या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली. प्रवाशांना बसस्थानकात आल्यानंतर आणि सर्व मार्गावरील गाव-थांब्यावरील प्रवाशांना वेळेत बससेवा मिळावी यासाठी प्रत्येक मार्गावर १० ते ३० मिनिटाच्या अंतराने दिवसभर फेऱ्या सुरू करण्यात आल्या. काळीपिवळीची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक असलेल्या पैठण-संभाजीनगर आणि सिल्लोड -संभाजीनगर मार्गावर खास करून पहाटेपासून रात्री ९ वाजेच्या सुमारास दर १५ मिनिटाला फेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला दर १० ते ३० मिनिटांच्या अंतराने बसफेऱ्या सुरू असल्याने या शटल सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र आगारप्रमुखांचे दुर्लक्ष आणि चालक-वाहकांची मनमानी यामुळे बसफेऱ्यांमधील अंतर वाढत गेले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाढता वाढता बस फेऱ्या मधील अंतर वाढता वाढता तासभरापर्यंत गेले.

वास्तविक पाहता प्रत्येक आगारातून धावणाऱ्या प्रत्येक बसफेऱ्यांचा अहवाल विभाग नियंत्रक कार्यालयाकडे येत असताना कोलमडलेल्या शटल बससेवेबाबत विभाग नियंत्रकाचे दुर्लक्ष होत असल्याने आगारातील अधिकाNयांचे धाडस वाढले आणि त्यांनी शटल बसच्या पेâNया रद्द करण्याचा सपाटा सुरू केला.

जानेवारी महिन्यात शटल बससेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये वर्षभरात तब्बल २० हजार फेऱ्या रद्द झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. विशेष म्हणजे यामध्ये पैठण आगाराने ३ हजार फेऱ्या रद्द करीत पराक्रम केला. अवेळी धावणाऱ्या आणि अचानक रद्द करण्यात येणाऱ्या फेऱ्यामुळे तासन् तास ताटकळत बसस्थानकात थांबणारा प्रवासी वैतागून पुन्हा काळीपिवळीकडे वळला आहे. सध्या पैठण -संभाजीनगर आणि संभाजीनगर-सिल्लोड मार्गावर काळीपिवळीची धूम सुरू आहे. या दोन्ही मार्गांवर सुमारे १०० काळीपिवळीतून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे शटलचे प्रवासी भारमान ५३ टक्क्यांवर आले आहे. असे असतानाही विभाग नियंत्रक कार्यालयाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने शटल बससेवा दिवसन्दिवस कोलमडत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येणाऱ्या दिवसात ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या