
बारावीच्या निकालानंतर आता पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एफवायला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांसमोर तीन किंवा चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय असेल. पदवी अभ्यासक्रमाची पहिली तीन वर्षे पारंपरिक असून चौथे वर्ष 2026-27 पासून सुरू होणार आहे. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून सध्या अभ्यासक्रम आराखडय़ावर काम सुरू असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. चार वर्षे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सुमारे 200 महाविद्यालयांनी नोंदणी केली असल्याचेही ते म्हणाले.
पारंपरिक तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षात प्रवेश घ्यायचा की नाही हे ठरविणे ऐच्छिक असेल. काही निकष पूर्ण करणाऱया महाविद्यालयांनाच चौथे वर्ष सुरू करण्याची परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थीसंख्येच्या नैसर्गिक वाढीनुसार महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करता येणार नाही. केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालवणाऱया आणि पीजी विभाग किंवा संशोधन केंद्र नसलेल्या महाविद्यालयांना चार वर्षांचा अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
क्रेडिट ऍकॅडमिक बँक
प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट ऍकॅडमिक बँक उघडण्यात येईल. या अंतर्गत आधारकार्डच्या आधारे विद्यार्थ्याचे खाते उघडण्यात येईल. प्रत्येक वर्षी 40 याप्रमाणे तीन वर्षांसाठी 120 आणि चार वर्षांसाठी 160 क्रेडिट पॉईंट विद्यार्थ्यांना मिळतील. या पॉईंटच्या आधारे पदवी शिक्षणानंतर संशोधनासाठी किंवा रोजगार संधीसाठी त्याचा फायदा होईल, असेही डॉ. देवळाणकर यांनी सांगितले. अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरानंतर क्रेडिट्सचे तपशील द्यावे लागतील. उदाहरणार्थ, चार वर्षांच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना, यूजी प्रमाणपत्रासह, किमान 40 क्रेडिट्स आवश्यक आहे. ज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमातील चार क्रेडिट्स किंवा मुख्यशी संबंधित इंटर्नशिप आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांमधील सहा क्रेडिट्सचा समावेश असेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत जूनपासून चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. सध्या तरी ग्रामीण भागात याची सक्ती केली जाणार नाही. पण भविष्यात तिथेही चार वर्षं अभ्यासक्रमाचा पर्याय ऐछिकचा असेल. चौथ्या वर्षात प्रवेश घ्यायचा असल्यास 7.5 सीजीपीए किंवा तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमात 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक