
पिझ्झा खाणाऱ्यांची जगात संख्या बरीच मोठी आहे. आपल्या आवडीनिवडीनुसार टॉपिंगमध्ये बदल करत पिझ्झाप्रेमी तो खात असतात. पिझ्झा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात मिळतो. मात्र हा पिझ्झा आजकाल नाही तर 2 हजार वर्षे किंवा त्यापूर्वीपासून खाल्ला जात असल्याचं कळालं आहे. रोमन साम्राज्यात पॉम्पेई शहर हे अत्यंत प्रसिद्ध शहर होतं . या शहरातील एक चित्र संशोधकांना सापडलं आहे. भिंतीवर रेखाटण्यात आलेलं हे चित्र आजही उत्तम स्थितीत आहे. या चित्रामध्ये एका थाळीमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवण्यात आल्याचं दिसत असून यामध्ये पिझ्झाही ठेवलेला पाहायला मिळाला आहे. मात्र या पिझ्झावर आज पाहायला मिळतं तसं टॉपिंग काही दिसत नाही. 2 हजार वर्षांपूर्वी पिझ्झावरील टॉपिंग हे पूर्णपणे वेगळं होतं, मात्र जो पदार्थ चित्रात दिसतोय तो पिझ्झासदृश्य पदार्थच असल्याचं संशोधकांचे म्हणणे आहे.
इटलीमध्ये इतिहास संशोधक सध्या उत्खनन करत असून यामध्ये एका बेकरी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या हॉलमध्ये हे चित्र असलेली भिंत सापडली आहे. रेजियो नाईन भाग हा पॉम्पेईच्या मध्यभागी वसलेला असून रोमच्या इतिहासात हा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जायचा. या भागात 19 व्या शतकात बरंच उत्खनन आणि शोधकाम करण्यात आलं होतं, मात्र मधल्या काळात इथलं काम थांबलं होतं. हे काम यावर्षी जानेवारी महिन्यात पुन्हा सुरू झालं आहे. चांदीच्या ताटात साधंसं जेवण हे थोडंसं विरोधाभासी असल्याचं संशोधक गॅब्रिअल झुटट्रिगल यांनी म्हटलंय. आपण हा विचारच करत नाही की पिझ्झा हा देखील दक्षिण इटलीमधील गरिबांचा खाद्यपदार्थ होता.
नेपल्सपासून 24 मैल अंतरावर हे चित्र सापडले असून ज्या भागात हे चित्र सापडले आहे त्या भागातील पिझ्झा बनवण्याच्या प्राचीन पद्धतीला युनेस्कोने वारशाचा दर्जा दिला आहे. पॉम्पेई हे शहर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नष्ट झालं होतं. 16 व्या शतकामध्ये या शहराचा शोध लागला होता. जानेवारी महिन्यापासून या भागात सातत्याने उत्खनन सुरू असून नवनवीन शोध लावण्याचे आणि इतिहासावर नव्याने प्रकाशझोत टाकण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. पॉम्पेई शहरातील संशोधनामुळे सातत्याने नवनीव गोष्टी उजेडात येत असतात. नव्या संशोधनामुळे हे बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.