अमिताभ बच्चन- रजनीकांत यांच्या उपस्थितीत ‘इफ्फी’ची गोव्यात शानदार सुरुवात

629

50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा बुधवारी गोव्यात शानदार कार्यक्रमाने प्रारंभ झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत या दिग्गजांची उपस्थिती, शंकर महादेवन आणि जॅझचे दैवत मानले जाणारे लुई बॅन्कस्‌ यांचे बहारदार संगीतमय सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांनी गोव्यातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेला हा उद्‌घाटन सोहळा रंगतदार ठरला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले.

एक खिडकी योजनेमुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते हिंदुस्थानकडे आकर्षित होतील, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी हिंदुस्थानात अनेक सुंदर स्थळे आहेत. चित्रिकरणासाठी पंधरा-वीस परवानग्या घ्याव्या लागतात. ही परिस्थिती बदलावी, यासाठी एक खिडकी योजनेचे काम सुरु असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले. गोवा, लेह-लडाख, अंदमान-निकोबार यासारख्या स्थळांना त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले.

फ्रेंच चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सिनेसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रख्यात अभिनेते, भारतीय चित्रपट क्षेत्राचे थलैवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबीली ॲवॉर्डने गौरवण्यात आले. चित्रपट अभिनेते अमिताभ यांचा उल्लेख आपले स्फूर्तीस्थान असा करुन हा पुरस्कार आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह आपल्या चाहत्यांना समर्पित करत असल्याचे रजनीकांत यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले. सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्ताने यावेळी एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.

या महोत्सवात 76 देशांमधले 200 हून अधिक उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात 26 फिचर फिल्म्स आणि 15 नॉन फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवात 10 हजारहून अधिक सिनेप्रेमी सहभागी होत आहेत. 28 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहिल. इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी मान्यवरांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या