हुंड्यात मागितले 21 नखांचे कासव आणि काळा लॅब्रेडॉर कुत्रा, ‘वरा’कडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमध्ये राहणाऱ्या नवरा मुलाकडील मंडळींनी वधू पित्याकडे हुंड्यात 10 लाख रुपये, 21 नखांचे कासव, लॅब्रेडोर जातीचा काळा कुत्रा आणि समई मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सतत वाढत जाणारी हुंड्यातील गोष्टींची यादी पाहिल्यानंतर तरुणीने हे लग्न करायचे नसल्याचं जाहीर केले. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी नवऱ्याकडची मंडळी सोनं-चांदी, रोकड मागायची. आता कासव आणि कुत्रे मागू लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नवरा मुलगा आणि त्याच्या घरचे हे मूळचे नाशिकचे राहणारे आहेत. मुलगा हा सैन्य दलात नोकरी करणारा असून त्यांनी संभाजीनगरातील मुलगी पसंत केली होती. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर घरच्यांची बोलणी झाली आणि मुलगी पसंत असल्याचं नवऱ्या मुलाकडच्यांनी सांगितलं. साखरपुडा पार पडल्यानंतर मुलाकडील व्यक्तींनी मुलीला नोकरी लावतो म्हणून दहा लाखाचा हुंडा, 21 नखी जिवंत कासव, लॅब्रेडॉर जातीचा काळा कुत्रा आणि समईची मागणी केली.

मुलीच्या वडिलांनी सुरुवातीला हुंड्यात काही पैसे दिले होते. पण मुलाच्या घरच्यांकडून सातत्याने पैशांची मागणी वाढायला लागली. हे पाहिल्यानंतर तरुणीने आपल्याला हे लग्न करायचं नसल्याचं सांगितलं. यानंतर तिच्या वडिलांनी मुलगा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उस्मानपुरा पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नाशिकच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मुलीचे वडील हे वीटभट्टी व्यावसायिक असून त्यांच्या मुलीला नाशिकच्या एका कुटुंबाने पसंत केले होते. या दोन्ही पक्षामध्ये हुंड्याबाबत सव्वादोन लाख रुपये तसेच सोन्याची अंगठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुलीच्या वडिलांनी साखरपुडा करताना ही मागणी पूर्ण केली होती. मात्र, त्यानंतर वर पक्षाकडील मंडळींनी आणखी काही वस्तूंची यादीच मुलीच्या वडिलांसमोर ठेवली. यात जिवंत कासव,  लॅब्रेडॉर कुत्रा, मूर्ती आणि समईसारख्या वस्तूंचा समावेश होता. हेे पाहून मुलीने नकार दिला ज्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.  या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करत उपनिरीक्षक साधना आढाव यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.

हुंड्यात कुत्रा आणि कासव कशासाठी ?

मानव प्रगत होत चालला आहे, मात्र त्याच्या मनातील अंधश्रद्दा काही दूर होत नाहीत. हुंड्यातील विचित्र मागण्यांमागे या अंधश्रद्धाच कारणीभूत आहेत. अशी अंधश्रद्धा आहे की मानलं जातं काळा कुत्रा घरात असेल तर घरामध्ये शांतता नांदते. 21 नखांचे कासव घरात असल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि संपत्ती येते. या अंधश्रद्धांमुळेच हुंड्यात कुत्रा आणि कासवाची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या