पूजापत्रींची साक्षरता मोहीम

174

मेधा पालकर

गणेशोत्सव काळात गणपतीला पत्री अर्पण केल्या जातात. सध्या विविध प्रकारच्या पत्री बाजारात आल्या आहेत. ती खरेदी करताना प्रत्येकजण तिची सत्यता तपासून घेतेच असे नाही. त्यामुळे आता गणेशपत्रींमध्येही खूप भेसळ दिसत आहे. मुळात गणपतीला अर्पण करण्यात येणाऱ्या २१ पूजापत्री कोणत्या याची माहिती नसते. ती गणेशभक्तांपर्यंत पोहविण्यासाठी आणि गणेशपत्रींच्या नावाखाली काही औषधी वनस्पतीही ओरबाडल्या जात आहेत, हे थांबविण्यासाठी पुण्यातल्या बायोस्पियर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी ‘पत्री साक्षरता मोहीम’च हाती घेतली आहे.

धार्मिक शास्त्रात नमूद करण्यात आलेल्या २१ पूजापत्रींपैकी १८पत्री पुणे शहरातील एकवीस प्रातिनिधिक गणपतींना अर्पण करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणाऱ्या सर्व पत्री वनौषधी असून त्या आपल्या शरीरास तसेच निसर्गासाठीही उपयुक्त आहेत. या वनस्पतींबद्दल जागृती आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने पूर्वजांनी धार्मिक विधींमध्ये त्यांचा समावेश केला. मात्र, अलीकडील काही वर्षांत गणेशोत्सवामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या पत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. पत्रीत समावेश नसलेल्या काही दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ आणि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहेत. विदेशी कनस्पतीही मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

हे लक्षात घेता संस्थेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून पत्रींबाबत जागृती करण्यात येत आहे. त्यासाठी पूजापत्री साक्षरता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘गणेश पूजापत्री – परंपरा, पर्यावरण आणि प्रबोधन’ हे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये खरी गणेश पूजापत्री कुठली, पत्रीच्या नावचे श्लोक कुठले, भेसळ होणाऱ्या वनस्पतींबद्दल माहिती देण्यात आली आहे. यंदा आम्ही प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधला आणि त्यांना वनस्पतींची माहिती दिली.

शिवाय गेल्या चार दिवसांत संस्थेतर्फे पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींबरोबरच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती, सारसबाग तळ्यातील गणपतीसह २१ गणपती मंडळ आणि ट्रस्टला भेट देऊन खरी पूजापत्री अर्पण केली. पुजारी, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रींबद्दल सविस्तर माहिती दिली.

गणेशाला अर्पण करण्यात येणारी खरी पत्री
मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, विष्णुक्रांत(शंखपुष्पी), डाळिंब, देवदार, मरवा, आघाडा, शमी, डोरली, केवडा, कण्हेर, रुई, अर्जुन, पिंपळ,निरगुडी, जाई, हादगा.

पत्रीच्या नावाखाली ओरबडल्या जाणाऱ्या दुर्मिळ वनस्पती
कचोरा, चवर, भुई आमऱया, रानआले, सफेद मुसळी, कळलावी, महाळुंग, भारंगी.

पूजापत्रीत प्रामुख्यने भेसळ होणाऱ्या वनस्पती कुठल्या
गुडमई, आंबा, शंकासूर, सीताफळ, तेरडा, उंदीरमारी, खैर, वेडीबाभूळ, सुबाभूळ, गुलबक्षी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, पर्जन्यवृक्ष.

आपली प्रतिक्रिया द्या