
राज्याच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा करून देणारे खाते म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभाग ओळखला जातो. या विभागाच्या महसुलात सरत्या आर्थिक वर्षात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरत्या आर्थिक वर्षात या विभागाने 21 हजार 500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल जमा केला आहे. मागील आर्थिक वर्षात विभागाने 17 हजार 500 कोटी इतका महसूल मिळवला होता.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यार्कयुक्त आणि अमली पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुह्यांचे अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते. विभागाने बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक तसेच विक्री रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले. तसेच भरारी पथकांना तपासणी नाक्यांवर प्रभावीपणे सक्रिय केले. या प्रयत्नांमुळे विभागाला सरत्या आर्थिक वर्षात विक्रमी महसूल जमा करण्यात यश आले.
सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17 हजार 500 कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता सन 2022-23 या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने 21 हजार 500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात यश मिळवले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे.