विम्बल्डनवर पुन्हा अल्काराज; जोकोविचचा धुव्वा उडवत जेतेपद राखले, ग्रॅण्डस्लॅम फायनल जिंकण्याचा चौकार

विम्बल्डनच्या हिरवळीवर पुन्हा एकदा स्पेनच्या 21 वर्षीय कार्लोस अल्काराझचेच राज्य दिसले. त्याने ग्रॅण्डस्लॅम फायनल जिंकण्याचा चौकार ठोकताना टेनिस किंग नोव्हाक जोकोविचचा अडीच तासांत 6-2, 6-2, 7-6 (7-4) असा पराभव करत विम्बल्डनचे जेतेपद राखण्याचाही पराक्रम केला. गेल्या वर्षीही त्याने जोकोविचचा पराभव करत आपले पहिलेवहिले विम्बल्डन जेतेपद जिंकले होते.

आज टेनिसप्रेमींची घोर निराशा झाली. बहुतांश टेनिसप्रेमी नोव्हाक जोकोविचच्या रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. पण त्याने साऱयांना निराश केले. अल्काराझच्या वेगवान पह्रहॅण्ड आणि बॅकहॅण्डपुढे जोकोविचचा खेळ दमल्यासारखा भासला. पहिले दोन सेट 6-2, 6-2 असे तासाभरातच जिंकत अल्काराझने विम्बल्डनवर आपलाच ताबा असणार याचे संकेत दिले. मात्र तिसऱया सेटमध्ये जोकोविचचा खेळ दिसला. त्याने अल्काराझला चांगलेच झुंजवले. प्रत्येक गुणासाठी संघर्ष करायला लावले. हा सेट जिंकून तो सामन्यात पुनरागमन करेल, असा खेळही त्याने दाखवला, पण टायब्रेकरमध्ये खेळला गेलेला हा सेटही अल्काराझनेच जिंकला आणि जोकोविचचे रुपेरी ग्रॅण्डस्लॅमचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवले.

अल्काराझचा अनोखा चौकार

अल्काराझ आपल्या चार वर्षांच्या छोटय़ाशा कारकीर्दीत तो 14 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा खेळला आहे. त्यापैकी 2022 मध्ये पहिले जेतेपद अमेरिकन ओपन जिंकताना त्याने पॅस्पर रूडला हरवले होते. त्यानंतर त्याने गेल्या वर्षी जोकोविचला हरवत विम्बल्डन जिंकले. मग या वर्षी तो फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि जिंकलासुद्धा. विशेष म्हणजे तो आतापर्यंत चार फायनल खेळला आणि चारही जिंकला. याचाच अर्थ तो फायनलमध्ये पोहोचल्यावर जिंकतोच. आता अमेरिकन ओपनमध्ये त्याला ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

जोकोविचची रुपेरी अधुरी कहाणी

गेल्या वर्षी डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत त्याने अमेरिकन ओपन जिंकला आणि आपल्या ग्रॅण्डस्लॅम कारकीर्दीतील विक्रमी 24 वे जेतेपद पटकावले. त्यानंतर या वर्षी तो विश्वविक्रमी 25 व्या जेतेपदासाठी तिन्ही स्पर्धा खेळला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याचे स्वप्न यानिक सिनरने उपांत्य फेरीतच भंग केले. मग फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली आणि आता अल्काराझने त्याला अंतिम फेरीत नमवले. वर्षभर ज्या जेतेपदाची जोकोविच प्रतीक्षा करतोय ती आगामी अमेरिकन ओपनमध्ये संपेल, अशी आशा आहे.