हिंदुस्थानातून फ्रान्समध्ये मुलांची तस्करी, सीबीआय चौकशी सुरू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातून फ्रान्समध्ये मुलांची तस्करी सुरू आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने २२ अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरू केला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमधील २२ मुले बेपत्ता असून ती तस्करी करुन फ्रान्समध्ये नेण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या हाती आली आहे.

अल्पवयीन मुलांच्या तस्करीच्या प्रकरणात सीबीआय तीन ट्रॅव्हल एजंटची चौकशी करत आहेत. फरिदाबाद येथील ललित डेव्हिड डीन तसेच दिल्लीतल्या संजीव रॉय आणि वरुण चौधरीची चौकशी सुरू आहे. सीबीआयने ठिकठिकाणी धाडी टाकून बरीच कागदपत्रे जप्त केली आहेत. या कागदपत्रांमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्राथमिक चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल एजंटनी २५-३० लाख रुपयांचे आमिष दाखवून पालकांकडून मुलांचा ताबा मिळवला होता. नंतर मुले फ्रान्सला पाठवण्यात आली. तस्करीसाठी १३ ते १८ या वयोगटातील मुलांची निवड करण्यात आली. पॅरिसमध्ये रग्बी खेळाच्या प्रशिक्षणाची संधी आहे, खेळातून मोठी कमाई करता येईल असे स्वप्न दाखवून ट्रॅव्हल एजंटनी २५ मुलांना उत्तर हिंदुस्थानातून थेट फ्रान्सला पाठवले होते.

फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर मुलांचे रग्बी प्रशिक्षण सुरू झाले. मात्र आठवड्याभराचे प्रशिक्षण झाले असताना परतीच्या प्रवासाचे तिकीट रद्द झाले आहे आणि नवे बुकिंग करण्यासाठी वेळ लागेल, असे मुलांना सांगण्यात आले. सगळा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे २ मुलांनी वारंवार ट्रॅव्हल एजंटकडे चौकशी सुरू केली. अखेर त्या मुलांना हिंदुस्थानात पाठवण्यात आले. बाकीच्या २३ जणांना पॅरिसमध्येच एका गुरुद्वारात ठेवण्यात आले. तिथून बाहेर पडून आसपासच्या भागात फिरत असताना एका मुलाला स्थानिक पोलिसांनी अटक केली. या अटकेची माहिती मिळताच गुरुद्वारातून बाकीच्या २२ मुलांना गायब करण्यात आले. अद्याप बेपत्ता मुलांबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.

फ्रान्स पोलिसांनी इंटरपोल मार्फत हिंदुस्थानात संपर्क केल्यानंतर सीबीआयने २२ बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी मायदेशात तीन ट्रॅव्हल एजंटची चौकशी सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या