मटण हंडी खाऊन मालकीण नोकराच्या प्रेमात पडली, 33 वर्षांनी मोठ्या माणसाशी सुंदरीने लग्न केलं

नोकराने बनवलेली मटण हंडी मालकिणीला इतकी आवडली की तिने डायरेक्ट त्याच्याशी लग्नच करून टाकलं. महत्त्वाची बाब ही आहे की हा नोकर मालकिणीपेक्षा 33 वर्षांनी मोठा आहे. लग्नानंतर हा नोकर आता मालकिणीच्या घरातील सगळी कामं करतो. आलिया (22 वर्षे) असं या महिलेचं नाव असून तिचं घरकाम करणाऱ्या रफीकवर (55 वर्षे) प्रेम जडलं होतं. या दोघांची पहिली भेट ही रिक्षात झाली होती. पहिल्या भेटीत आलियाला रफीक आवडला नव्हता. तिने रफीकला थोबाडीतही मारली होती, मात्र रफीकने तिला मटण हंडी खायला घातली आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली.

पाकिस्तानी युट्युबर सैय्यद बासित अली याने या जोडप्याची मुलाखत घेतली आहे. यामध्ये या दोघांनी त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली हे सांगितलं आहे. रफीकने सांगितलं की तो आणि आलिया एका रिक्षातून जात होते. यावेळी रिक्षात असलेला एक तरुण आलियाकडे टक लावून बघत होता. रफीकला हे न आवडल्याने त्याने त्या तरुणाला आलियाकडे बघू नकोस असं सांगितलं होतं. तरीही तो आलियाकडे पाहात राहिला. यामुळे रफीक संतापला आणि त्याने त्या तरुणाला मारहाण केली. हा तरुण गेल्यानंतर रफीक आलियाकडे एकटक पाहायला लागला. यामुळे आलिया त्याच्यावर संतापली आणि तिने त्याचा कानाखाली मारली. आलियाचं मात्र या प्रकाराबाबत वेगळं म्हणणं आहे. तिने म्हटलंय की तरुणापेक्षा रफीकच तिच्याकडे टक लावून बघत होता, ज्यामुळे मी त्याच्या कानाखाली मारली.

आलिया पहिल्याच नजरेत रफीकला आवडली होती. ती रिक्षातून उतरल्यानंतर लोचट मजनू सारखा रफीक तिचा पाठलाग करत तिच्या घरपर्यंत गेला होता. आलिया घरात शिरल्यानंतर रफीक तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी रफीक पुन्हा आलियाच्या घरी गेला होता. आलियाने त्याला घराबाहेर पाहिल्याने तिने त्याच्याशी वाद घालत त्याला हाकलून दिलं होतं. तीन दिवस हाच प्रकार सुरू होता. चौथ्या दिवशी आलियाला रफीकवर दया आल्याने तिने त्याला विचारलं की “तुला काय हवंय ?” यावर रफीकने आलियाला सांगितलं की मला नोकरी हवी आहे. मला जेवण चांगलं बनवता येत असून मी घरातली इतरही कामं करतो असं रफीकने आलियाला सांगितलं. यानंतर आलियाने रफीकला घरात नोकरीसाठी ठेवलं. रफीकने पहिल्या दिवशी मटण हंडी बनवली होती. ती आलियाला इतकी आवडली की ती त्याच्या प्रेमातच पडली. आलियाने म्हटलंय ज्या पद्धतीने रफीक जेवण बनवतो आणि मला खायला घालतो, तसं मला कोणीच खायला घालत नाही. त्याच्या याच गुणामुळे मी त्याच्या प्रेमात पडले असं तिने म्हटलंय. आलिया ही ऑनलाईन कमावते तर रफीक हा घरकाम करतो असं जोडप्याने म्हटलंय.