हिंदुस्थानमध्ये वर्षभरात घडल्या अॅसिड हल्ल्याच्या २२२ घटना

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानमध्ये अॅसिड हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वर्षभरात अॅसिड हल्ल्याच्या २२२ घटना घडल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अॅसिड हल्ल्याच्या सर्वाधिक घटना दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगालमध्ये घडल्या आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत राष्ट्रीय गुन्हे विभागाचा अहवाल सादर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालातील माहितीनुसार देशात वर्षभरात अॅसिड हल्ल्याच्या घटनांमध्ये ९.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१५-२०१६ मध्ये २२२ अॅसिड हल्ल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

२०१४ मध्ये हा आकडा २०३ इतका होता. पण २०१५ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये ५५, पश्चिम बंगालमध्ये ३९, दिल्लीमध्ये २१, बिहारमध्ये १५ आणि मध्य प्रदेशमध्ये १४ अॅसिड हल्ले झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हरियाणा सारख्या लहान राज्यांमध्येही अॅसिड हल्ल्याच्या १० घटना घडल्या आहेत.

तसेच या हल्ल्याप्रकरणी २०१५ मध्ये देशभरातून ३०५ जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यातील १८ प्रकरणांतील आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या घटनांमुळे पीडित महिलेचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. पण त्यातील काही जणांनी परिस्थितीवर मात करुन स्वत:ची ओळख निर्माण केल्याचे यावेळी अहीर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या