23 लाखांची फसवणूक; संगमनेर पोलीस ठाण्यात दोन भावांवर गुन्हा दाखल

संगमनेर शहरातील चार मोठय़ा बँकांना सोन्याच्या बनावट दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱया गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच आता मनोली येथील दोघा भावांनी शहरातील एका सोसायटीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे 7/12 उताऱयावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. श्री. कुलस्वामीनी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

सुनील शिंदे याने 30 नोव्हेंबर 2017 रोजी पाचशे रुपये भरून बँकेचे सभासदत्व घेतले होते. त्यानंतर 16 एप्रिल 2018 रोजी त्याने फळ विक्रीच्या व्यवसायासाठी संस्थेकडे 23 लाख रुपयांची कर्ज मागणी केली. त्यासाठी त्याने आवश्यक कागदपत्रांसह तारण म्हणून मनोली येथील गट नंबर 77/1/1 क्षेत्र 0.81 आर व देवठाण येथील 150 गुंठे अशा जमिनीचे गहाणखत संस्थेला करून दिले होते. त्यासाठी सहकर्जदार संदीप शिंदे, जामीनदार विलास शिवदास बेंद्रे, बाबासाहेब रामभाऊ थोरात, त्यांची पत्नी तृप्ती शिंदे व योगिता शिंदे यांच्या संमतीनंतर 10 मे 2018 रोजी मॉर्गेज झाल्यानंतर मनोली व देवठाण येथील तलाठय़ांना कर्जदारांच्या उताऱयावर इतर अधिकारात संस्थेचा बोजा नोंद करण्यासाठी अर्जदाराकडे संस्थेच्या लेटरपॅडवर सही-शिक्क्यांसह पत्र देण्यात आले होते.

अर्जदाराने तलाठय़ांना पत्र पोहोच केल्याची पोहोच 18 मे 2018 रोजी दिली. त्यानंतर अर्जदाराला 20 लाख रुपयांचा कॅनरा बँकेचा धनादेश देण्यात आला. इतर हक्कात संस्थेच्या नावाची नोंद होण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागत असल्याने फेरफार व बोजा नोंद उतारे दिल्यानंतर अर्जदाराला पुन्हा शहर सहकारी बँकेचा तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. अशा पद्धतीने अर्जदाराने संस्थेकडून 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर कर्जदाराने सप्टेंबर 2020 अखेर आरटीजीएस, फोन पे व रोख स्वरूपात अशा पद्धतीने 4 लाख 17 हजार रुपये संस्थेकडे भरणा केला होता.

नंतर कर्जदाराचे हप्ते थकल्याने संस्थेकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर कर्जदार सुनील शिंदे, सहकर्जदार संदीप शिंदे यांच्याविरोधात 24 फेब्रुवारी 2022 रोजी उपनिबंधक संस्थेकडे कर्जवसुलीसंदर्भात दावा दाखल करण्यात आला असून, हा दावा न्यायप्रविष्ट आहे. दाव्याच्या सुनावणीदरम्यान उपनिबंधक सर्जेराव कांदळकर यांच्यासमोर कर्जदार सहकर्जदाराने मिळकतीवरील बोजा फेरक्रमांक 4672 ने कमी केल्याचा फेरफार दिला.

त्यामुळे कर्जदाराने कर्ज न भरता बोजा कसा कमी झाला याबाबत मनोली येथे जात तलाठय़ाला संस्थेच्या कर्मचाऱयांनी विचारणा केली असता, त्यांनी कर्जदार सुनील शिंदे, सहकर्जदार संदीप शिंदे यांनी 11 फेब्रुवारी 2020 रोजी संस्थेने त्यांच्या शेतजमिनीवरील श्री कुलस्वामीनी संस्थेच्या कर्जाच्या बोजाची नोंद दुरुस्ती करण्यासंदर्भात दिलेले पत्र दाखविले. या पत्रावरील सही, शिक्का खोटा असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच कर्जदारांनी कर्ज न भरल्याचे सांगितल्यानंतर तलाठय़ाने या शेतजमिनीवरील बोजा पुन्हा कायम केला. मात्र, कर्जदारांनी संस्थेचे खोटे कागदपत्र तयार करत बोजा कमी करण्यासाठी त्याचा आधार घेतल्याने या दोघांविरोधात संस्थेने पोलिसांकडे धाव घेतली आहे.