गडचिरोलीत इतर जिल्ह्यातून आलेले 23 जण कोरोना पॉझिटिव्ह

468

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा 23जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व एकजण भंडारा जिल्ह्यातील असून नोकरीत रूजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाला होता. यातील सर्व 23 जण पुरूष आहेत. सर्वांना जिल्ह्यात आल्यानंतर यामध्ये सीआरपीएफला कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील एका व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्ह्यात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73 राहणार आहे. या रुग्णांच्या नोंदी पोर्टलवर करून राज्य स्तरावरून त्या त्या ठिकाणी अपडेट केल्या जाणार आहेत. 23 पैकी 7 नोंदी राज्यस्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्ह्यात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

सीआरपीएफचे 23 जवान सुट्टीवर होते ते नागपूरहून 27 जूनला जिल्ह्यात आले. सर्व जण सीआरपीएफच्या बसने आले होते. तसेच जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले. यातील 23 पैकी 18 जण पॉझिटिव्ह आढळले तर 5 निगेटिव्ह आले आहेत. तसेच 4 इतर जवान खाजगी वाहनाने इतर जिल्ह्यातून आले होते. त्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानुसार 23 पैकी 18 व चार पैकी 4 असे 22 सीआरपीएफ जवान शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

  • जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित – 73
  • जिल्हयातील अॅटिव्ह रुग्ण 13
  • जिल्हयातील कोरोनामुक्त – 59
  • इतर राज्य व जिल्ह्यातील उपचार सुरु असलेले रुग्ण – 24

एकुण 23 कोरोना बाधितांचे ठिकाण व संख्या
पश्चिम बंगाल -10, उत्तर प्रदेश-2, कर्नाटक -2, ओरीसा-2, झारखंड -1, बिहार -1, अकोला -1, नांदेड -2, चंद्रपूर -1 आणि भंडारा -1

आपली प्रतिक्रिया द्या