सुडौल दिसण्यासाठी बँकेला 2 कोटी 49 लाखांचा गंडा घातला, 23 वर्षांच्या तरुणीला अटक

रशियामध्ये एका 23 वर्षांच्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. बँकेतून 2 लाख 60 हजार पाऊंड (2,49,41,015 रुपये) चोरल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. केसेनिया ओरलोवा असं या तरुणीचं नाव आहे. केसेनिया रशियातील ‘निझनी नोवगोराड’ या बँकेत कॅशिअर म्हणून कामाला होती. हे पैसे आपण स्तनांचा आकार वाढवण्यासाठीची शस्त्रक्रिया आणि विविध क्रीडा सामन्यांवर पैजा लावण्यासाठी चोरल्याचं केसेनियाने कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. केसेनियाला या चोरीसाठी 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

केसेनियाला चोरलेल्या पैशांची उधळपट्टी करायची होती, तिला त्यातून आयफोनही घ्यायचा होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. ‘कोमोसोमोलस्काया प्रावदा’ या वर्तमानपत्राशी बोलत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी केसेनियाच्या अटकेबद्दल माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 23, 2022 या काळात केसेनियाने पैसे चोरल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अटकेच्या काही दिवसांपूर्वीच तिने स्तनांचा आकार वाढवण्याची शस्त्रक्रिया करून घेतली होती. या संपूर्ण गुन्ह्याच्या चौकशीसाठी केसेनियाला 2 महिने पोलिसांच्या ताब्यात ठेवलं जाणार आहे. पोलिसांनी केसेनियाचा नवरा एल्विन गासानोव (24 वर्षे) याचीही चौकशी सुरू केली आहे.

केसेनियाला पैसे चोरल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचं जेव्हा तिच्या सहकाऱ्यांना कळालं तेव्हा त्यांना धक्का बसला. केसेनिया अत्यंत हुशार होती आणि बँकेत जमा झालेल्या पैशांमध्ये काही नोटा कमी असतील किंवा जास्त असतील, मोजणी चुकली असेल तर केसेनिया हे सगळे प्रॉब्लेम सोडवण्यात पटाईत होती असं तिच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. केसेनियाला लवकरच प्रमोशनही मिळणार होतं असं तिच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय.