ऑक्सिजन न मिळाल्याने कर्नाटकात 24 रुग्णांचा मृत्यू

कर्नाटकच्या चामराजनगर जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी 24 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. रुग्णांना होणारा ऑक्सिजनपुरवठा काही कारणांमुळे बंद झाला. मात्र प्रशासनाने त्याकडे लक्षच दिले नाही. बराच वेळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागला. या दुर्घटनेला प्रशासन व भाजपच्या येडियुरप्पा सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

चामराजनगर जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील 24 पैकी 23 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह होते, तर एका रुग्णाला दुसऱया आजारामुळे व्हेंटिलेटरवर ठेवले होते. या रुग्णांना शेजारच्या मैसूर जिह्यातून ऑक्सिजनपुरवठा केला जात होता. रविवारी सकाळी हा पुरवठा काही कारणांमुळे ठप्प झाला. त्याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे पुढील अवघ्या दोन तासांत 24 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेला रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱयांचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असा आरोप करीत मृतांच्या नातेवाईकांनी दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चामराजनगरचे पालकमंत्री सुरेश कुमार यांनी घटनेचा सविस्तर अहवाल मागवला असून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे, तर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावली आहे. घटनेबाबत जिल्हा आयुक्तांशी चर्चा केली असल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या राजीनाम्याची मागणी

या दुर्घटनेवरून काँग्रेसने मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री के. सुधाकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुर्घटनेला राज्य सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘हे मृत्यू की हत्या?’ असे ट्विट केले. दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस, कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आरोग्यमंत्र्यांच्या अटकेची मागणी केली आहे. येडियुरप्पा सरकारच्या हयगयीमुळे हत्या झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशात 4 रुग्ण दगावले; अर्धा तास प्राणवायू पुरवठा खंडित

कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशातही ऑक्सिजन न मिळाल्यामुळे 4 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावा लागला. बडवानी जिल्हा रुग्णालयात शनिवारी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनपुरवठा जवळपास अर्धा तास बंद होता. त्यामुळे लहान मुलासह चौघांचा तडफडून मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाची बेपर्वाई जीवावर बेतल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मध्य प्रदेशातही कोरोनाचा कहर वाढतो आहे. मात्र विषाणूचा फैलाव आटोक्यात आणण्यास भाजपचे शिवराज सरकार अपयशी ठरत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू होऊनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मात्र या वृत्ताचे खंडन केले. रुग्णालयात केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाला, तोही हृदयविकाराने, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला. दुसरीकडे बडवानीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी लोकेश कुमार जांगीड यांनी ऑक्सिजनच्या कमी पुरवठय़ामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले. ट्रॉमा सेंटर प्रशासनाने सेंट्रल पाइपलाइनमध्ये ऑक्सिजनचा साठा अपुरा असल्याची तक्रार केली होती. त्यावर आमच्या ऑक्सिजन मेपॅनिकने ती समस्या दूर केली, असे त्यांनी सांगितले. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या