बोट बुडाल्याने बिहारमध्ये २४ जणांना जलसमाधी

29

सामना ऑनलाईन,पाटणा

बिहारची राजधानी पाटणा इथे गंगा नदीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने बोट बुडाली. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून एकूण ५० जण प्रवास करत होते, ज्यांच्यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. एन.डी.आर.एफ.ने आत्तापर्यंत २१ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या ठिकाणी शोधकार्य अजूनही सुरू आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आदेश दिले आहेत.ही दुर्घटना होत असताना मोबाईलवर काही जणांनी त्याचा व्हिडिओ चित्रीत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर बिहार सरकारने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

rescue-operation-in-bihar

 

या दुर्घटनेनंतर बिहारमधील राजकारणही तापलंय. या दुर्घटनेसाठी विरोधी पक्षांनी नितीश कुमार सरकारला जबाबदार धरलंय. विरोधकांचं म्हणणं आहे की ही दुर्घटना राज्य सरकारने आयोजित केलेल्या पतंग उत्सव संपल्यानंतर परतत असताना झाली आहे. घटनास्थळी सुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणं धोकादायक असतं हे माहिती असूनही जास्त प्रवासी बोटीमध्ये घेण्यात आले होते. याला पायबंद नसल्याने ही दुर्घटना झाली असं विरोधकांनी म्हटलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या