पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रामुळे कलोते मोकाशी धरणातील पाणी दूषित झाले आहे. याच दूषित पाण्याचा पुरवठा होत असलेल्या कलोते गावातील सुमारे 25 मुलांना कावीळची बाधा झाली आहे. त्यामुळे गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मुलांना कावीळ झाली असली तरी आरोग्य यंत्रणेने मात्र कोणतीच हालचाल केलेली नाही. आरोग्य यंत्रणेच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
कलोते धरणाचे पाणी यापूर्वी शुद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी धनदांडग्यांनी येथील शेतकऱ्यांच्या जागा घेऊन या ठिकाणी फार्महाऊस बांधले आहेत. या फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी पाळले जात आहेत. पाळीव प्राण्यांमध्ये प्रामुख्याने उंट, गाय, अनेक जातींचे कुत्रे, घोडा, ससे, मांजर यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या मलमूत्रासाठी कोणतीही व्यवस्था फार्महाऊसच्या मालकांनी केलेली नाही. त्यामुळे हे सर्व मलमूत्र धरणाच्या पाण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात मलमूत्र मिसळत असल्याने धरणाचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. याच पाण्याचा पुरवठा कलोते गावासह परिसराला केला जातो. मोठ्या संख्येने ग्रामस्थ हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र पाणी दूषित झाल्यामुळे कलोते गावातील २५ मुलांना कावीळची बाधा झाली आहे. दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारामुळे अनेक ग्रामस्थही आजारी पडले आहेत. धरणातील पाणी दूषित झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे,
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
विशेष म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय याच गावात असून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर हाकेच्या अंतरावर खालापूर, चौक ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र आरोग्य खाते बेसावध असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. या परिसरातील स्थानिक कार्यकर्ते यांचे पाठबळ असल्यामुळे कुणालाही न जुमानता राजरोसपणे येथे पाळीव प्राण्यांचा व्यवसाय सुरू आहे. यासंदर्भात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून शासकीय पातळीवर निवेदन देण्यात आले. मात्र या निवेदनाची कोणतीही दखल शासकीय पातळीवर घेण्यात आलेली नाही