रेल्वे पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड

सर्व नोटा २ हजारांच्या; दोघांना घेतले ताब्यात

पुणे– ज्ञानगंगा एक्स्प्रेसने वाराणसी येथून पुण्यात २५ लाख रुपयांची नवीन चलनातील रोकड घेऊन आलेल्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी पुणे स्टेशनवर पकडले. ही रक्कम जप्त करून, पुढील कारवाईसाठी आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.

मनीष उमाशंकर द्विवेदी (वय ३६, रा. शिवनगर कॉलनी, भुलणपूर, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश), प्रमोदकुमार मेवालाल जैसवाल (वय २४, रा. नुरी, जि. चंदोली, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
द्विवेदी व जैसवाल हे दोघे वाराणसी येथून ज्ञानगंगा एक्स्प्रेसने पुणे स्टेशनवर पोहोचले. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर लोहमार्ग पोलिसांकडून बॅगांची तपासणी सुरू असताना त्यांनी द्विवेदी व जैसवालला हटकले. त्यांची बॅग तपासली असता, त्यातमध्ये २ हजारांच्या नोटांचे बंडल दिसून आले.

याबाबत चौकशी केली असता, वाराणसी येथील गंगा पेपर्स लिमिटेड कंपनीची ही रोकड आहे, ती पुण्यातील अधिकार्‍याला देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले; पण त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. ही रक्कम जप्त करून याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली. जुन्या नोटा बदलण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना लोहमार्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, अतिरिक्त अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तुकाराम वहिले, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिम्मत माने पाटील, कर्मचारी आंबासे, लाखे यांनी ही कारवाई केली.