संगमेश्वरातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर, आरोग्य अधिकाऱ्यांची २५ पदे रिक्त

सामना ऑनलाईन, संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यात आरोग्य विभागातील २५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याचा कारभार हाकताना कार्यरत कर्मचाऱयांची दमछाक होत आहे. याचा फटका रुग्णसेवेला बसत असून रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य अधिकाऱयांच्या २० पैकी १७ ची भरती झाली आहे. औषध निर्माण अधिकाऱ्यांची ११ पदे असून ती सर्व कार्यरत आहेत. कुष्ठरोग तंत्रज्ञाची ३ पदे मंजूर असून त्यातील एकही पद भरण्यात आलेले नाही. आरोग्य सहायक पुरुष १४ पदे मंजूर असून ती सर्व भरण्यात आली आहेत. आरोग्य सहायक महिला ११ पदे मंजूर असून येथेही सर्व कार्यरत आहेत. आरोग्य सेवक पुरुष मंजूर २९ पैकी २४ पदे भरण्यात आली आहेत. आरोग्य सेविका ६६ पदे मंजूर असून त्यातील ६३ पदे भरण्यात आली आहेत. परिचर ३४ मंजूर असून २५ भरण्यात आली आहेत. परिचर स्त्री ११ पदे मंजूर असून येथे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत. सफाई कामगार ११ पदे मंजूर असून त्यातील ९ कार्यरत आहेत. त्यामुळे तालुक्यात विविध विभागांची एकूण २५ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या ज्या विभागाची पदे रिक्त आहेत त्यांचा भार कार्यरत कर्मचाऱयांना सोसावा लागत आहे. तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून २ ग्रामीण रुग्णालये व ५५ प्रा. आ. उपकेंद्र आहेत. या सर्वच ठिकाणी काही ना काही रिक्त पदांची समस्या कायम आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील या रिक्त पदांचा फटका रुग्णांनाही सोसावा लागत आहे.

पद भरतीचे आदेशच नाहीत
रिक्त पदांबाबत तालुका आरोग्य अधिकाऱयांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे वेळोवेळी अहवाल पाठवला आहे. मात्र शासनाकडून भरतीचे आदेश येत नसल्याने या पदांची भरती रखडल्याचे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या