मोबाईलची पंचविशी

अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरीने अलीकडील काळात जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोबाईल फोनचा सहभाग झाला. वास्तविक, हिंदुस्थानात मोबाईल सेवेची सुरुवात झाली 1995 मध्ये. नुकतीच त्याला 25 वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला इनकमिंगसाठी पैसे मोजावे लागणारी मोबाईल सेवा कालांतराने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. गेल्या पाव शतकामध्ये टूजी, थ्रीजी, फोरजी असा प्रवास करत मोबाईल सेवा तांत्रिकदृष्टय़ा अधिकाधिक प्रगत होत गेली. आता फाईव्हजीच्या आगमनाचीही चाहूल लागली आहे. या प्रवासाचे सिंहावलोकन करताना जमेच्या बाजू अनेक दिसत असल्या तरी आज मोबाईलचा अतिवापर आणि गैरवापर ही गंभीर समस्या बनली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील स्पर्धा संपुष्टात येण्याची भीतीही तितकीच महत्त्वाची आहे 

आज 25 वर्षांनंतर पुढे जात असतानाचे चित्र पाहिले तर मोबाईलच्या वापराने अनेक गोष्टी सोप्या-सुकर झालेल्या आहेत, संवाद-संभाषण, माहितीचे आदानप्रदान कमालीचे वाढलेले आहे; पण त्याच वेळी मोबाईलवर वायफळ वेळ खर्ची घालणाऱ्य़ांची संख्याही लक्षणीय बनली आहे. टिकटॉकसारख्या ऍपवर बंदी ही चीनला विरोधासाठी असली तरी त्याचा एक पैलू हिंदुस्थानात याचा होणारा बेसुमार आणि अनावश्यक वापर व उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे त्या तरुण पिढीचा अक्षरशः वाया जाणारा वेळ वाचवणे हाही आहे. आज व्हॉटस्ऍप विद्यापीठातून मिनिटागणिक फिरणाऱ्य़ा माहितीने समाजात संभ्रमही वाढला आहे. लहान मुलांना जडलेले इंटरनेटचे-मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे, हा आज हिंदुस्थानातील अनेक पालकांपुढे पडलेला गहन प्रश्न बनला आहे. ही नकारात्मक बाजू अधिक झुकत गेल्यास  ‘याचसाठी केला होता का अट्टहास’ असा प्रश्न विचारावा लागेल.  

हिंदुस्थानात मोबाईल सेवेची सुरुवात झाली त्याला नुकतीच म्हणजे 31 जुलै रोजी 25 वर्षे पूर्ण झाली. 1995 मध्ये पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तेव्हाचे केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल दूरध्वनी केला होता. मोबाईलचा वापर सुरू झाला तेव्हा सुरुवातीला कॉलिंगसाठीच नव्हे, तर कॉल स्वीकारण्यासाठीही मोठे शुल्क मोबाईलधारकाला अदा करावे लागत होते. त्यामुळे ही सुविधा सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. त्यावेळी लिखित स्वरूपातील मेसेजेस पाठवण्यासाठी पेजरचा वापर अधिक होत होता. हळूहळू ही सेवा स्वस्त होत गेली आणि मोबाईल फोनचा आकार, जडपणा यामध्ये बदल झाला आणि ते वापरण्यास सुलभ बनले. 2004 मध्ये सर्वप्रथम इनकमिंग कॉलिंग मोफत झाले आणि वापरकर्त्यांकडून केवळ कॉल करण्यासाठीच शुल्क आकारणी केली जाऊ लागली. त्या वेळच्या तंत्रज्ञानानुसार ही सुविधा केवळ कॉलिंगसाठी किंवा संभाषणासाठी आणि लिखित स्वरूपातील संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठीच असेल असे सर्वसाधारणपणे मानले जात होते. गेल्या पाव शतकात यामध्ये आमूलाग्र बदल होत गेला. विशेषतः इंटरनेटचा वापर मोबाईलच्या सहाय्याने करण्याची सुविधा उपलब्ध झाली आणि या बदलांनी क्रांतिकारक स्वरूप घेतले.

मोबाईल तंत्रज्ञानाच्या पाच पिढय़ा-ज्यांना आपण जनरेशन असे म्हणतो-आलेल्या आहेत. यातील पहिल्या पिढीमध्ये फक्त संभाषणाची सोय होती. यामध्ये ऍनॅलॉग तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. दुसऱ्य़ा पिढीला ज्याला आपण टूजी म्हणतो त्यामध्येही संभाषण, संदेशांची देवाणघेवाण इतकीच सुविधा होती, पण त्यासाठी ऍनॅलॉगऐवजी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल सेवेची कार्यक्षमता वाढली आणि त्यातील चुका बऱ्य़ाच प्रमाणात कमी झाल्या. कमी बँडविडथ् किंवा कमी फ्रिक्वेन्सीचा वापर करून जास्त प्रमाणात वाहतूक एकीकडून दुसरीकडे नेणे शक्य झाले. हिंदुस्थानमध्ये मोबाईल सेवेची सुरुवात झाली तेव्हा ही ‘सेकंड जनरेशन’ सुरू होती. त्यानंतर आलेल्या थर्ड जनरेशनच्या वेळी या सर्व तंत्रज्ञानांचे स्वरूप बदलले आणि जीएसएम व सीडीएमए ही दोन तंत्रज्ञाने पुढे आली. त्या वेळी या दोन्हींपैकी कोणते तंत्रज्ञान जास्त यशस्वी ठरेल आणि पुढे जाईल असा प्रश्न उपस्थित झाला होता. युरोपमध्ये सर्वत्र जीएसएम तंत्रज्ञान लोकप्रिय होते तर अमेरिकेत सीडीएमएचा बोलबाला होता. क्वालकॉम या कंपनीने सीडीएमए हे तंत्रज्ञान आणले होते. त्याची मूळ कल्पना अशी होती की, एकाच वेळेला खूप संभाषणे एका टॉवरमधून पाठवली गेली तरी पलीकडचा टॉवर त्यातील नेमके कोणाचे संभाषण कुठले आहे हे सहजपणे निवडू शकेल. जीएसएममध्ये ही क्षमता तुलनेने थोडी कमी होती. त्यामुळे यातील नेमके काय निवडायचे असा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाला होता. हिंदुस्थानातील मोठय़ा कंपन्यांनी जीएसएम निवडले, पण अनिल अंबानींच्या रिलायन्सने आणि टाटा टेलिसर्व्हिसेसने सीडीएम निवडली. तथापि पुढील काही वर्षांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरल्याचे लक्षात आले. जगभरात जास्तीत जास्त प्रमाणात जीएसएम लोकप्रिय होत गेले आणि त्यासाठीची यंत्रणा विकसित होत गेली. त्यामुळे सीडीएमएच्या वापरकर्त्यांना बऱ्य़ाच अडचणींचा सामना करावा लागला. कालांतराने जीएसएमचा वापर हिंदुस्थानातही वेगाने वाढत गेला आणि लोकप्रियही झाला. परिणामी, सीडीएमए तंत्रज्ञान मागे पडत गेले.

फोरजीचा शोध साधारण 2000 च्या अखेरीस लागला; पण हिंदुस्थानात 2016 मध्ये या सेवेची सुरुवात झाली. यामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने आघाडी घेतली आणि इतर कंपन्यांनाही अपरिहार्यपणे याकडे वळावे लागले. फोरजीच्या आगमनाने कॉलिंगमधील स्पष्टताही वाढली आणि मोबाईलवर वेगवान इंटरनेट अवतरल्याने डेटाचा वापर कमालीचा वाढत गेला. रोजच्या जीवनाशी निगडित विविध ऍप्स झपाटय़ाने विकसित होत गेले आणि पाहता पाहता डिजिटल युगाचा आरंभ झाला. आता रिलायन्स जिओने फाईव्ह-जीची घोषणा केली आहे. त्यासाठीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. हिंदुस्थान-चीन वादामुळे चिनी कंपन्यांना फाईव्ह-जीच्या क्षेत्रात येऊ द्यायचे नाही असे ठरल्यामुळे जिओने हे तंत्रज्ञान आपणच हिंदुस्थानात उभे करण्याचे ठरवले आहे. फाईव्ह-जी तंत्रज्ञानामध्ये आज इंटरनेटचा वेग एमबीपीएस किंवा जीबीपीएसमध्ये आहे, तो टीबीपीएसमध्ये (टेराबिटस्) मोजला जाईल. आज साधारण 3 जीबी आकार असणारा एखादा हाय डेफिनेशन चित्रपट इंटरनेटवरून डाऊनलोड करायचा झाल्यास त्यासाठी अर्धा ते दोन तासांचा कालावधी लागतो. फाईव्ह-जी सेवा आल्यानंतर यासाठी काही सेकंदांचा अवधी पुरेसा ठरेल. अर्थातच, मोबाईल तंत्रज्ञानाचे पुढचे जनरेशन अवतरले की त्याला पूरक तंत्रज्ञान, टॉवर्स, मोबाईल हँडसेट, ऑप्लिकेशन्स विकसित करावे लागतात. हे बदल येणाऱ्य़ा काळात घडताना आपल्याला दिसतील.

हिंदुस्थानातील मोबाईल सेवेचा हा टूजी ते फाईव्ह-जीपर्यंतचा प्रवास रंजक आणि क्रांतिकारक ठरला असला तरी त्यामध्ये अनेक वळणेही येत गेली. टूजी सेवेच्या वेळी झालेले राजकारण हे यातील महत्त्वाचे वळण. त्याचा फटका तत्कालीन यूपीए सरकारला बसला, पण कंपन्यांनी जे स्पेक्ट्रम विकत घेऊनही वापरले नाहीत त्याचे काय, हा प्रश्न तसाच राहिला. मग ते विकत घेण्यासाठी उर्वरित कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. आज मोबाईल सेवा पुरवणाऱ्य़ा जिओ आणि एअरटेल या दोनच प्रमुख कंपन्या हिंदुस्थानात उरल्या आहेत. आयडिया-व्होडाफोन पूर्णपणाने डबघाईला आलेल्या आहेत.

बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्या अकार्यक्षमपणाने कशा चालतील यासाठी सरकारी पातळीवरूनही प्रयत्न झाल्याचे आरोप केले जातात. वास्तविक, बीएसएनएल या स्पर्धेमध्ये खूप पुढे होती, पण त्यांचे नोकरशाहीअंतर्गत वाद, कार्यपद्धती आणि जोडीला सरकारकडून जाणीवपूर्वक न मिळणारे सहाय्य यामुळे ही मोबाईल सेवा पुरवणारी सरकारी कंपनी स्पर्धेतून बाद झाली. आज जिओ इतर कंपन्यांना मोडीत काढत मत्तेदारीच्या दिशेने निघाली आहे हे वास्तव आहे. सद्यस्थितीत मोबाईल सेवा, हँडसेट, इन्फ्रास्ट्रक्चर, दुकानदार यांबरोबरच आता पेमेंट करण्याच्या सुविधेतही जिओने प्रवेश केला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सऍपला हिंदुस्थानात यूपीआयसाठी अद्याप परवाना मिळालेला नाही, पण फेसबुकने जिओशी भागीदारी केलेली आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे जिओ मनीचा वापर करून पेमेंट केले तरी तो सर्व डेटा फेसबुकलाही उपलब्ध होणार आहे. आज हिंदुस्थानात फिचर्स फोनची संख्या स्मार्टफोन्सपेक्षा जास्त आहे. हे लक्षात घेऊन जिओने मोठय़ा प्रमाणावर फिचर्स असलेले फोन बाजारात आणले. येणाऱ्य़ा भविष्यात जिओ ही एकच कंपनी उरली तर ते निश्चितच उचित ठरणारे नाही.

[email protected]

लेखक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत

आपली प्रतिक्रिया द्या