पुतण्यामुळे काका देवेंद्र फडणवीस अडचणीत; 25 वर्षीय तन्मयला लस कशी मिळाली?

कोरोना लसीकरणासाठी 45 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे; परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस फक्त 25 वर्षांचा असताना त्याला लस कशी मिळाली, असा प्रश्न कॉँग्रेसने केला आहे. तन्मय याने लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काका देवेंद्र मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत.

तन्मय फडणवीस याने नागपूर येथील पॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये जाऊन लस घेतली. लस घेतल्यावर त्यांनी याचा फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. त्यानंतर ‘चाचा विधायक है हमारे’ अशा कॅप्शनसह तन्मय याचा लस घेतल्यानंतरचा फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे.

तन्मयचे वय 45 वर्षे आहे का? तो फ्रंटलाइन कामगार आहे का? तो आरोग्य कर्मचारी आहे का? जर यापैकी काहीच नसेल तर त्याला लस कशी मिळाली? भाजपजवळ रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनचा पुरवठा आहे का, असे प्रश्न कॉँग्रेसने केले आहेत.

पहिला डोस मुंबई आणि दुसरा नागपूरमध्ये 

तन्मय फडणवीस याने कोरोना लसीकरणाचा पहिला डोस मुंबई येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये घेतला होता. तेथील सर्टिफिकेटच्या आधारावर आम्ही त्याला दुसरा डोस दिला. त्याने कोणत्या नियमांनुसार पहिला डोस घेतला हे आम्हाला माहीत नसल्याचे नागपूर येथील कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे डायरेक्टर शैलेश जोगळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

तो माझा लांबचा नातेवाईक

तन्मय माझा दूरचा नातेवाईक असून त्याने कसे लसीकरण केले हे मला माहीत नाही; परंतु त्याने जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर ते चुकीचे आहे. सध्या माझ्या मुलीचे पत्नीचेदेखील लसीकरण झाले नाही. कारण ते त्यास पात्र नाहीत. माझे म्हणणे आहे की, नियम हे सर्वांना सारखे असायला हवेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात  हात झटकले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या