पिंपरीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 250 वर; शहर अद्यापही ‘रेडझोन’मध्येच

पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 250 वर गेली आहे. गुरूवारी 12 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये चिंचवड स्टेशन, दिघी, पिंपळे-सौदागर, वाल्हेकरवाडी, पिंपरी आणि मुंबईतील रहिवाशांचा समावेश आहे. महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट गुरूवारी सकाळी आणि दुपारी मिळाले. त्यामध्ये 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

महापालिका रुग्णालयात 87 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत शहरातील 252 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 142 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 16 बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नऊ अशा 16 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. शहरातील मोशी, सांगवी, चहोलीतील 10 जणांनी गुरुवारी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. त्यांना महापालिकेने तयार केलेल्या बालेवाडी क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 142 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरीत तब्बल 16 मृत्यूंची नोंद
पिंपरीत कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गुरूवारी मिळालेल्या अहवालात एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 16 जण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. शहरातील 252 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 142 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 87 पॉझिटीव्ह रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत 16 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाचा जास्त धोका वयोवृद्ध आणि लहान मुलांना असला तरी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण तरूणाईमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. शहरात आतापर्यंत 252 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तब्बल 110 तरूणांचा समावेश आहे. शहरात 22 ते 39 वयोगटातील तब्बल 110 तरूणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण तरूणांमध्ये आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वय असलेल्यांचा समावेश आहे. या वयोगटातील 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 13 ते 21 वय असलेल्या 36 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वय असलेल्या 27 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 26 वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी – चिंचवड शहर अद्यापही ‘रेडझोन’
पिंपरी – चिंचवड शहरात दोन दिवसांपासून रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन शुक्रवारी (दि. 22) मध्यरात्रीपर्यंत शहर रेडझोनमध्येच राहणार आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने पुर्वीचा रुग्ण वाढीचा कमी असलेला दर पाहून शहराचा ‘नॉन रेडझोन’मध्ये समावेश केला आहे. परंतु, पुढील दोन दिवसात किती रुग्ण वाढतात, ते पाहून योग्य निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत रेडझोनमधील जुनेच नियम लागू असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या