मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसाठी 252 कोटींचा निधी

59
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मुंबईसह देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये महिला सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘निर्भया’ निधीतून तीन हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यातील 252 कोटी रुपये मुंबईसाठी देण्यात येणार आहेत. या निधीतून महिला सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी धोक्याची सूचना देणारी बटणे लावली जाणार असून महिला पोलिसांची विशेष गस्ती पथके स्थापन केली जाणार आहेत.

वुमन सेफ सिटी प्रोजेक्टअंतर्गत हा निधी महिला सुरक्षेच्या विविध उपाययोजनांवर खर्च केला जाणार आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ या शहरांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची विशेष पोलीस पथके असतील आणि त्यांना विशेष ‘अभयम’ व्हॅन दिल्या जातील. या शहरांमधील पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिकेने मिळून हे काम करायचे आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना 2015 पासून वाढल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये देशात महिलांवरील अत्याचाराच्या 3 लाख 29 हजार 243 घटनांची नोंद झाली होती. 2016 पर्यंत त्यात वाढ होऊन हा आकडा 3 लाख 38 हजार 954 झाला. 2015 आणि 2016 मध्ये बलात्काराच्या अनुक्रमे 34,651 आणि 38,947 घटना घडल्या.

सुरक्षेसाठी असतील या उपाययोजना…

  •  महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक घडतात तिथे स्मार्ट एलईडी पथदिवे लावणे.
  •  सार्वजनिक वाहनांमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष उपाय करणे.
  •  सार्वजनिक ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारी बटणे लावणे.

 

आपली प्रतिक्रिया द्या