दमदार कामगिरी, कोरोना लढ्यातही पालिकेच्या शीव रुग्णालयात अडीशचे यशस्वी शस्त्रक्रिया

देवेंद्र भगत । मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनाविरोधातील लढय़ात सुरुवातीपासून अग्रस्थानी असणाऱया पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल बाराशे अत्यवस्थ रुग्णांवर अतिदक्षता विभागात यशस्वी उपचार करण्यात आले असून 254 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये मेंदू, फ्रॅक्चर, प्रसूती, अपघाताच्या शस्त्रक्रियांसह अँजिओग्राफीचा समावेश आहे. विशेष म्हणजे हजारो कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना ही दमदार कामगिरी करण्यात आली आहे. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी ही माहिती दिली.

पालिकेच्या शीव रुग्णालयात एप्रिलपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. शीव रुग्णालयातील एकूण 1750 बेडपैकी 300 बेड कोरोना रुग्णांसाठी तैनात ठेवण्यात आले. यानुसार आतापर्यंत तब्बल 4 हजार 261 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील 3 हजार  रुग्ण शीव रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर काही जणांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले. कोरोनाचा प्रभाव असताना शीव ‘नॉन कोव्हिड’ आजारांवरही नियमितपणे उपचार सुरू होते. यामध्ये नियमित आजारांबरोबरच शस्त्रक्रिया, प्रसूती विभागही सुरू होते. विशेष म्हणजे या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह महिलांची यशस्वी प्रसूती झाल्याचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

शेकडो डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा कर्तव्यावर

शीव रुग्णालयात 210 डॉक्टर्ससह 655 आरोग्य कर्मचारी आहेत. यामध्ये 128 नर्स, 167 क्लार्प-टेक्निशियन आणि 150 कामगारांचा समावेश आहे. यातील सुमारे 125 डॉक्टरांसह अनेक आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली.

यातील सर्व कोविड योद्धय़ांनी कोरोनाला हरवून पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली आहे. शीव रुग्णालयातील सुमारे 300 डॉक्टरांनी पालिकेने सुरू केलेल्या कोविड जम्बो फॅसिलिटीमध्ये आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे उपलब्ध केवळ 300 डॉक्टर्सच्या सहाय्याने शीव रुग्णालयात शस्त्रक्रिया, इतर आजारांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रभाव असताना इतर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ’नॉन कोव्हिड’ आजारांवरही उपचार सुरू आहेत. यामध्ये शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी शेकडो डॉक्टर्स-नर्स-आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असतानाही हे काम सुरू आहे.डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, शीव रुग्णालय

आपली प्रतिक्रिया द्या