कश्मीरच्या तुरुंगांतील 26 दहशतवाद्यांना आग्य्रामध्ये हलवले, हवाई दलाच्या विशेष विमानातून रवानगी

जम्मू-कश्मीरच्या विविध तुरुंगांतील 26 दहशतवाद्यांना शुक्रवारी हवाई दलाच्या विशेष विमानातून उत्तर प्रदेशच्या आग्रा मध्यवर्ती तुरुंगात हलवण्यात आले. कश्मीर खोऱ्यात मागील पंधरा दिवसांत 11 नागरिकांच्या हत्या झाल्या. या हत्यासत्रामध्ये कश्मीरच्या तुरुंगांमध्ये कैद असलेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी 26 पैदी दहशतवाद्यांची आग्य्रात रवानगी केली आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यापासून कश्मीरात दहशतवादी सक्रिय झाले आहेत. त्यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसांत 11 नागरिकांच्या हत्या केल्या. यात बहुतांश बिगरकश्मिरींचा समावेश आहे. या घटनांमुळे कश्मीर खोऱ्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याअनुषंगाने सरकारने दहशतवादविरोधी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कश्मीरच्या विविध तुरुंगांमध्ये कैद असलेल्या 26 दहशतवाद्यांना आग्रा मध्यवर्ती तुरुंगामध्ये शिफ्ट केले आहे. या दहशतवाद्यांनी तुरुंगातूनच नागरिकांवरील हल्ल्याची सूत्रे हलवल्याची शक्यता आहे. सरकार आणखी दहशतवाद्यांना कश्मीरबाहेरील इतर तुरुंगांमध्ये हलवण्याच्या तयारीत आहे.