कोरोनाने घेतला 26 वर्षांच्या डॉक्टरचा बळी; अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर काही तासाताच मृत्यू

दिल्लीच्या जीटीबी रूग्णालयातील 26 वर्षांच्या डॉक्टरचा कोरोनाने बळी घेतला आहे. अवघ्या 26 वर्षांच्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात हळहळ व्यक्त होत असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रुग्णालयातील डॉक्टर अनस मुजाहिद यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना तपासणीचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर काही तासातच उपचारादरम्यान अनस यांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 26 व्या वर्षी निधन झाल्याने तसेच अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे.

डॉक्टर अनस मुजाहिद कोविड रुग्णालयात कार्यरत होते. त्यांनी जानेवारीमध्ये एमबीबीएसचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. दिल्लीतील भागीरथी विहारमध्ये राहणारे अनस मुजाहिद यांनी त्यांच्या वार्डमध्ये शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांची ड्यूटी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी कोरोना तपासणी केली. शनिवारी रात्री 8 वाजता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. लगेचच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी इंट्राक्रैनील ब्लीडिंगच्यामुळे त्यांचे निधन झाले.

अनस मुजाहिद यांचे सहकारी डॉक्टर आमिर सोहल यांनी सांगितले की, डॉक्टर अनस मुजाहिद यांना लिला हॉटेलमध्ये रुम मिळाला होता. इफ्तारनंतर हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी त्यांना कणकण जाणवली. त्यानंतर त्यांनी जीटीबी रूग्णालयात ॲंटीजन चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.त्यानंतर डॉक्टर अनस अचानक बेशुध्द होऊन पडले.

डॉक्टर आमिर सोहल यांनी सांगितले की आम्ही अनस यांना कॅज्युलिटीवार्ड मध्ये घेऊन गेलो. पण ते बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांचे सीटी-स्कॅन करण्यात आले. त्यात त्यांच्या मेंदूत रस्तस्राव होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना न्यूरोलॉजी विभागात पाठवण्यात आले. तिथे उपचारादम्यान त्यांचे निधन झाले.

अनस मुजाहिदीन यांनी कोरोना लसीचा डोस घेतला नव्हता. डॉक्टर अनस यांचा भाऊ मौज यांनी सांगितले की,आम्हाला रात्री 10 वाजता फोन आला,आपण लवकरात लवकर रूग्णालयात या, आम्ही रुग्णालयात पोहचलो. तेव्हा त्यांना वाचवण्यात अपयश आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या घटनेने अनस कुटुंबीय आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला असून रुग्णालयात भीतीचे वातावरण आहे.

जीटीबी रूग्णालयाचे डीन एके जैन यांनी सांगितले की, आपण अजून अनसचा वैद्यकीय अहवाल पाहिला नाही. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.अनस आता आमच्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. जीटीबी रूग्णालयांचे डॉक्टर सत्येंद्र सिंह यांनी सांगितले की, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे.शनिवारपर्यंत डॉक्टर अनस यांची प्रकृती चांगली होती. मात्र, हे सर्व अचानक घडले. आम्हाला त्यांच्यावर उपचाराची संधी आणि वेळही मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या