
मुंबई महापालिकेतील आणखी एक घोटाळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी उघड केला आहे. सुमारे 260 कोटीं रुपयांचा हा स्ट्रीट फर्निचर घोटाळा असून घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि चाळीस साथीदारांचा हा प्रताप आहे. या घोटाळय़ाची चौकशी होणार का, असा प्रश्न त्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक महापालिकेत सध्या प्रशासक आहेत. त्यांच्या माध्यमातून हे घोटाळे केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभाग त्यासाठी प्रशासकांना आदेश देत आहे, असे आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
स्ट्रीट फर्निचरमध्ये 13 गोष्टी आहेत. पण लोकप्रतिनिधी, नगरसेवक पालिकेत नसल्यामुळे फक्त त्यातील दोन-तीन समजल्या आहेत. ते सर्व आयटम एकाच पंत्राटदारांकडून खरेदी करायचे, साडेपाच कोटी डिपॉझिट ठेवायचे अशी अट आहे. 40 हजार बाकडी, कुंड्या यांचा यात समावेश आहे. या 13 गोष्टी किती किमतीला विकत घेणार हेसुद्धा मुंबईकरांना सांगण्यात आलेले नाही. 6080 कोटी रुपयांच्या रस्ते कंत्राटात या स्ट्रीट फर्निचरचा समावेश नाही. हे वेगळे टेंडर काढले गेले आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना खुर्च्यांची गर्दी पहायला आवडते पण 40 हजार बाकडी तुम्ही लावणार कुठे? आहेत ती बाकडी काय करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. यातील तीन कंत्राटदारांची नावे आपल्याकडे आहेत, पण ती जाहीर करणार नाही, असेही ते म्हणाले.
सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानेही यापूर्वी पत्राद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता याची आठवणही त्यांनी करून दिली. परंतु त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. महापालिका प्रशासनाला या भ्रष्टाचारासाठी असंवैधानिक सरकारचा पाठिंबा दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या घोटाळ्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सरकारने दिलेली नाहीत. सौंदर्यीकरणासाठीही नगरसेवकांचा हक्काचा पैसा वळवला त्यावर उत्तर नाही. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा काढला त्याचे उत्तर नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
‘मायबीएमसी’ला सवाल…
– सीपीडी (आरोग्य विभागासाठी खरेदीचे प्रभारी) यांनी रस्ते विभागासाठी निविदा का काढल्या आहेत? हा नवा ट्रेंड आहे का?
– 6080 कोटी रस्ता घोटाळा खर्च, 1729 कोटी सुशोभीकरण घोटाळा खर्च, रस्त्यावरील फर्निचरमध्ये काय वेगळे आहे?
– या सर्व घोटाळ्यांची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. कदाचित आम्ही न्यायालयातही जाऊ. पण एक सांगतोय – उद्या आमचे सरकार येणारच आहे. त्यावेळी या घोटाळ्यांची चौकशी करून गुन्हेगारांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.