हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत गदारोळ, लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

हिंडेनबर्ग कंपनीने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे हिंदुस्थानच्या अर्थविश्वात खळबळ उडाली आहे. या अहवालामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची किंमत गेले काही दिवस रोज घसरत असून या समूहाने आपला महत्त्वकांक्षी एफपीओ पण रद्द केला आहे. या समूहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी , निमसरकारी संस्थांचा पैसा गुंतला असल्याने या मुद्दासंदर्भात सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याच मुद्दावरून विरोधकांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नकाळ चर्चेमध्ये वाया जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने विरोधकांनी गदारोळ केला, यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करावे लागले.