1 मार्चपासून नशीब महागणार! लॉटरीवर 28 टक्के जीएसटी

723

आधीच उतरती कळा लागलेल्या लॉटरी व्यवसायाच्या माथी केंद्र सरकारने वाढीव जीएसटीचा भार टाकला आहे. येत्या 1 मार्चपासून सर्व लॉटरीवर 28 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. लाखाची लॉटरी लागूनही हाती हजाराच्याच घरातील रक्कम मिळत असल्याने लॉटरीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यात जीएसटीच्या रुपात रक्कमेला आणखी कात्री लागणार असल्यामुळे ग्राहकसंख्या घटणार आहे. परिणामी लॉटरी विक्रेते देशोधडीला लागण्याची भिती आहे.

जीएसटी परिषदेने राज्य सरकार संचलित तसेच मान्यताप्राप्त लॉटरींवर एकाच दराने म्हणजेच 28 टक्क्यांनी जीएसटी आकारण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये घेतला. त्याच अनुषंगाने महसूल विभागाने लॉटरी पुरवठय़ावरील जीएसटी दराची अधिसूचना जारी केली आहे. तसेच आधीच्या केंद्रीय कर (दर) अधिसूचनेत दुरुस्ती केली आहे. त्यानुसार लॉटरीच्या पुरवठय़ावरील केंद्रीय कराचा दर 14 टक्के झाला असून राज्य सरकारसुद्धा तितक्याच दराने कर आकारणार आहे. त्यामुळे लॉटरीवरील एकूण जीएसटी 28 टक्क्यांवर जाणार आहे. येत्या 1 मार्च 2020 पासून या नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे. परिणामी, नशिब अजमावण्यासाठी लॉटरी काढणाऱया सर्वसामान्यांच्या हाती जिंकलेल्या रक्कमेपैकी निम्मीही रक्कम पदरी पडणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ग्राहकसंख्या कमी होईल आणि मोठय़ा प्रमाणावर लॉटरी विक्रेत्यांना या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहेत.

जीएसटी भरण्यास उशीर केल्यास व्याजाचा भार
जीएसटीची रक्कम भरण्यास उशीर केल्यास सरकारकडे व्याजासह रक्कम भरावी लागणार आहे. यासंदर्भात जीएसटीच्या कायद्यात दुरुस्ती केली आहे, असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने स्पष्ट केले आहे.

– सद्यस्थितीत राज्य सरकार संचलित लॉटरीवर 12 टक्के जीएसटी आकारला जातो, तर राज्य सरकारची मान्यता प्राप्त केलेल्या लॉटरींवर 28 टक्के जीएसटी लागू आहे. आता हा दर एकसमान होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या