वाढदिवसाचा केक कापताना मृत्यूने गाठले

सामना ऑनलाईन । मुंबई

हॅप्पी बर्थ डे टू यू डियर खुशबू… टाळ्य़ा वाजल्या, खुशबूने केक कापला… सगळे पार्टीच्या मूडमध्ये होते. कुणाला माहीत होतं हा तिचा अखरेचा वाढदिवस ठरेल. खुशबू जयेश भन्साली ही २८ वर्षांची विवाहिता आपल्या पती, बहिणीसोबत तसेच मित्रमैत्रिणींसोबत बर्थ डे पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेली होती. आगीत गुदमरून तिचा मृत्यू झाला. आगीत तिची जिवलग मैत्रीण किंजल जयेश मेहताही मरण पावली. दोघीही खेतवाडीतील राहणाऱ्या असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

खेतवाडी ११ व्या गल्लीत श्रीपती कॅस्टल टॉवरमध्ये १३ व्या मजल्यावर खुशबू भन्साली (माहेरचे आडनाव मेहता) राहते. तिच्या वाढदिवसाची पार्टी गुरुवारी कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल मोजोस बिस्त्रो रेस्टॉरंट ऍण्ड पबमध्ये आयोजित करण्यात आली होती. खुशबू पती जयेश आणि बहीण चेरीसोबत आली होती. खेतवाडी दुसऱ्या गल्लीत राहणारी तिची मैत्रीण किंजल भन्साली हीदेखील होती. याशिवाय अन्य मित्रमैत्रिणीही होत्या. पती-पत्नींच्या जोड्य़ा पार्टीला उपस्थित होत्या. उशीर झाला म्हणून काही जण निघून गेले. थोडेच उरले. मध्यरात्री पबमध्ये आग लागल्यानंतर पळापळ झाली. खुशबू आणि किंजल या दोघीही इतरांप्रमाणे जीव वाचण्यासाठी पळू लागल्या. खुशबूचे पती जयेश आणि बहीण चेरी पबबाहेर सुरक्षित बाहेर पडू शकले. खुशबू आत अडकली. काही क्षणांसाठी ती बाहेरही आली होती, मात्र पुन्हा आत गेली असेही समजते.

हॉटेलच्या मालक, मॅनेजरविरोधात गुन्हा
वन अबाव्ह आणि मोजोस रेस्टॉरंट ऍण्ड पब यांच्या मालक व मॅनेजरविरोधात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानका अशी त्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही फरारी असून ना. म. जोशी मार्ग पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्या तिघांविरोधात ३०७, ३३७, ३३८, ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाथरूमचा आसरा जिवावर बेतला
आग लागल्याची बोंबाबोंब होताच सर्वचजण जीव मुठीत घेऊन तत्काळ एक्झिट गेटच्या दिशेने धावले, मात्र नेमके त्या गेटजवळ सामान ठेवण्यात आले होते. त्यामुळे एक्झिट गेट काही उघडता आला नाही. परिणामी ज्यांना तेथून बाहेर पळता आले ते निसटले, पण अनेकांनी लपण्यासाठी बाथरूमचा आसरा घेतला. सर्वजण एकाच ठिकाणी आले आणि धुरामध्ये फसले. तिथे त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. धुरामध्ये ते गुदमरले. बाथरूमचा आसरा त्यांच्या जिवावर बेतला.

वन अबाव्हमध्ये हुक्काचा धूर निघायचा
मुंबईत हुक्का पार्लरला बंदी आहे, मात्र तरीदेखील वन अबाव्ह या रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालवला जात होता. तेथे बार टेंडर तोंडातून आग काढण्याचे प्रकारदेखील करून दाखवायचे. हे सर्व जीवघेणे आहे हे माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात असून मालक आणि मॅनेजरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या