
महावितरणच्या अहमदनगर मंडळाअंतर्गत असलेल्या श्रीरामपूर येथील औद्योगिक वसाहतीतील बाबाजी श्रीधाम इंडस्ट्रीज आणि श्रीरामपूर इंडस्ट्रियल इस्टेट या दोन्ही कारखान्यांच्या वीजजोडणीची महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने तपासणी केली. त्यावेळी वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून दोन्ही कारखान्यांमध्ये एकूण 1 लाख 81 हजार 94 विद्युत युनिटस म्हणजे एकूण 29 लाख 39 हजार 210 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या फिर्यादींवरून दोन्ही कारखाना चालकांविरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामधील एका प्रकरणात वीजचोरी बाबत माहिती अशी की, श्रीरामपूर औदयोगिक वसाहतीमध्ये बाबाजी श्रीधाम इंडस्ट्रीज या टाकाऊ कापडापासून सूत तयार करणाऱ्या या कारखान्याच्या ठिकाणी रामेश्वरप्रसाद मंगुराम भुराडीया या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली आहे. सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे नाशिक येथील भरारी पथक गेले असता वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून रिमोटच्या सहाय्याने विजेची चोरी केल्याचे भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले असून एकूण 1 लाख 11 हजार 265 विद्युत युनिटची म्हणजे एकूण 17 लाख 53 हजार 760 रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. मालेगाव येथून आलेल्या पप्पू नावाच्या व्यक्तीने सदर वीज मीटरच्या जोडणीत छेडछाड व रिमोट कंट्रोलची व्यवस्था करून दिली असल्याचे आरोपी यांनी तपासणी दरम्यान सांगितले. महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे रामेश्वरप्रसाद मंगुराम भुराडीया आणि पप्पू नामक व्यक्ती यांचे विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003च्या कलम 135 व 138नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत वीजचोरी बाबत माहिती अशी की, श्रीरामपूर औदयोगिक वसाहतीमध्ये श्रीरामपूर इंडस्ट्रियल इस्टेट या बर्फाच्याकारखान्याच्या ठिकाणी सचिन ज्ञानदेव गवारे या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या बर्फाच्या कारखान्याच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले असून एकूण 69 हजार 829 विद्युत युनिटची म्हणजे एकूण 11 लाख 85 हजार 450 रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे सचिन ज्ञानदेव गवारे याच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज चोरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे वीज वापर करणारे महावितरणच्या रडारवर आहेत. भारतीय विद्युत कायदा 2003च्या कलम 135 व 138नुसार वीजचोरी करणाऱ्याला कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.