मध्य रेल्वेवर 15 वर्षांत 29 हजार प्रवाशांचा मृत्यू, हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर 15 वर्षांत 29 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशी ऋषन यांनी बुधवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. असुरक्षित लोकल प्रवासाकडे लक्ष वेधत यतीन जाधव यांनी जनहित याचिका केली आहे.

2009 ते जून 2024 दरम्यान रेल्वे रूळ ओलांडणे, खाली पडणे, खांबाला धडकून, प्लॅटफॉर्म व फुटबोर्डच्या पोकळीमध्ये सापडणे आदी अपघातांत 29,321 प्रवाशांचा मृत्यू झाला. 2009 -10 मध्ये 3396, तर 2023-24 मध्ये 2159 अपघात घडले, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रेल्वेच्या प्रतिज्ञापत्रांची दखल घेत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्यास मुदत देत सुनावणी तहकूब केली.