Morocco earthquake – शक्तिशाली भूकंपाने आफ्रिकन देश मोरोक्को हादरला, 296 जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश मोरोक्को शक्तिशाली भूकंपाने (Morocco earthquake) हादरला आहे. या भूकंपामध्ये 296 जणांचा मृत्यू झाला असून 153 जण जखमी झाले आहेत. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती असून त्यांना वाचवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जखमी आणि बेपत्ता नागरिकांची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोला शुक्रवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.8 एवढी मापण्यात आली आहे. या भूकंपामुळे मोरोक्कोमध्ये हाहाकार उडाला असून शेकडो लोकांनी जीव गमावला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 296 लोकांनी जीव गमावला आहे.

मोरोक्कोच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. सोशल मीडियावर याचे व्हिडीओही व्हायरल होत असून लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना त्यात दिसत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेश शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एलटस पर्वताजवळील इघिल गाव असल्याची माहिती मिळत आहे. मोरोक्कोमध्ये हाहाकार उडवलेल्या भूकंपाचे धक्के थेट पोर्तुगाल आणि अल्झिरियामध्येही जाणवले.

120 वर्षांतीत सर्वात शक्तिशाली भूकंप

दरम्यान, उत्तर आफ्रिकेतील गेल्या 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याची माहिती युनायटेड स्टेटस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. 1900 सालापासून या भागातील 500 किलोमीटर परिसरात 6 किंवा त्याहून अधिक रिश्टल स्केलचा भूकंप झालेला नाही. याआधी येथे 5 रिश्टल स्केलच्या भूकंपाची नोंद नऊ वेळा झाल्याची माहितीही युनायटेड स्टेटस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

मोदींचे ट्विट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्कोतील भूकंपामध्ये प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त ऐकून दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो. हिंदुस्थान या कठीण काळामध्ये मोरोक्कोला सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे, असे ट्विट मोदींनी केले.