UP Election 2022 तिकीट देऊनही काँग्रेसचे 3 उमेदवार दुसऱ्या पक्षात पळाले

उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आणि खासकरून सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे, अशा मतदारसंघांसाठी जवळपास सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसनेही इतरांप्रमाणे त्यांचे उमेदवार घोषित केले होते. यातील 3 उमेदवार हे उमेदवारी मिळाल्यानंतरही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. काँग्रेसच्या सुदैवाने यातला एक उमेदवार पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाला आहे.

उत्तर प्रदेशात सत्तेपासून 3 दशके दूर असलेली काँग्रेस इथे पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करते आहे. यासाठी काँग्रेसने बऱ्याच विचारमंथनानंतर आपले उमेदवार निश्चित केले होते. युसूफ अली यांना काँग्रेसने चमरौआ मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. उमेदवारी मिळाल्यानंतरही ते समाजवादी पक्षात सामील झाले. अली यांना समाजवादी पक्षाकडून आपल्याला चमरौआ मतदारसंघातून उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. यामुळे दु:खी झालेल्या युसूफ अली यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली होती.

स्वार-टांडा नावाच्या मतदारसंघातून काँग्रेसने हैदर अली खान उर्फ हमजा मियां यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी मिळाल्यानंतरही ते काँग्रेसचा कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भाजपमध्ये सामील झाले. भाजपने त्यांना लगेच आपला सहकारी पक्ष असलेल्या अपना दलतर्फे त्यांना उमेदवारी देऊन टाकली. बरेली कँट मतदारसंघातून काँग्रेसने सुप्रिया ऐरन यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी समाजवादी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि बरेली कँट मतदारसंघातूनच उमेदवारी मिळवली.