मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात,३ तरुण ठार

43

सामना ऑनलाईन, पिंपरी

भरधाव स्विफ्ट मोटार माल ट्रकवर पाठीमागून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील तिघे तरुण जागीच ठार झाले. पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ गुरुवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ३ जण मृत्यूमुखी पडले असून त्यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव हेमंत बाळकृष्ण तळेकर (वय २७, रा. नागाव, ता. उरण, जि. रायगड ) असे आहे. उरलेल्या दोघांची ओळख अजून पटायची बाकी आहे. महामार्गचे फौजदार अनिल हगवणे यांनी याबाबत माहिती दिली.

गुरूवारी रात्री आठच्या सुमारास तिघे जण स्विफ्ट मोटारीतून (एमएच १४, बीके ९८६३) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते. उर्से टोलनाक्याजवळ भरधाव मोटार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. यात मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर मोटार आदळलेला ट्रक घटनास्थळी न थांबता तसाच पुढे निघून गेला. मोटारीचा चक्काचूर झाल्याने गाडीचा पत्रा फाडून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. खिशातील ओळखपत्रावरून हेमंत तळेकर यांची ओळख पटली. मात्र, इतर दोघांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. तीनही मृतदेह तळेगाव जनरल हॉस्पीटलमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. दोन मृतांची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे असी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या