परळी तालुक्यातून साडेतीन लाखांची गावठी तंबाखू जप्त

314

परळी तालुक्यातील टोकवाडी येथे छापा टाकत पोलिसांनी गावठी तंबाखूचे तब्बल 57 पोते जप्त केले. या तंबाखूची एकूण किंमत 3 लाख 42 हजार एवढी आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून संचारबंदी आहे. तसेच, तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे असे असतानाही विक्री करण्याच्या उद्देशाने परळी तालुक्यातील टोकवाडी येथील एका घरात तंबाखूचा मोठ्या प्रमाणात अवैध साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर धस यांच्या विशेष पथकाने रविवारी सायंकाळी 6.30 वाजता टोकवाडीतील कला केंद्राच्या पाठीमागे असलेल्या विठ्ठल पवार यांच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता पवार यांचा भाडेकरू सय्यद जाबेर सय्यद इब्राहीम याने त्याच्या खोलीत साठा करून ठेवलेली 3 लाख 42 हजार रूपयांची 57 पोते तंबाखू आढळून आली. दोन दिवसांपूर्वीच जाबेरने हा साठा तिथे आणून ठेवला होता. पोलिसांनी सर्व तंबाखू जप्त करून त्याचा नमुना परिक्षणासाठी अन्न व भेसळ विभागाकडे पाठवून दिला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार कल्याण सावंत यांच्या तक्रारीवरून सय्यद जाबेर सय्यद इब्राहीम याच्यावर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक स्वाती भोर, उपअधिक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कल्याण सावंत, हेड कॉन्स्टेबल शेख शफीक, पोलीस नायक अंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल खेलगुडे आणि चालक सपकाळ यांनी ही कामगिरी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या