बिबट्याचे 3 बछडे शेतात आढळले, परिसरात भीतीचे वातावरण 

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील अनिल छबू वाघ यांच्या उसाची मंगळवारी सकाळी नऊ वाजता तोडणी चालू असताना ऊसतोड मजुरांना तीन बिबट्याची पिल्ले आढळली. भयभीत झालेल्या मजुरांनी ही गोष्ट ऊस शेतमालकाला सांगितली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी पोहेगांवचे सरपंच अमोल औताडे यांनी केली आहे.

मंगळवारी (दि. 21 मार्च) रोजी सकाळी ऊस तोडणीला सुरुवात केली असता काही मजुरांच्या लक्षात आले की, या ठिकाणी बिबट्याचे तीन पिल्ले आहेत. त्यांनी बाकीच्या मजुरांना याबाबत सावध केले, मात्र बिबट्याच्या पिल्लांच्या बाजूला बिबट्याची मादी ओरडण्याचा आवाज काही मजुरांनी ऐकला. त्यामुळे त्यांनी हातातील कोयते टाकत काही काळ ऊस तोडणी बंद केली. परिसरातील नागरिकांची या बिबट्यांच्या पिलांना बघण्यासाठी गर्दी झाली. या परिसरात एक 2 ते 5 बिबट्या असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह वाडी वस्तीवर राहणारा नागरिक भयभीत झाला आहे. वन विभागाने आता दिरंगाई न करता तात्काळ या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच अमोल औताडे यांनी केली आहे.