बलात्काऱ्यासोबत अल्पवयीन पीडितेचं लग्न लावले, 3 पोलिसांविरोधात Pocso चा गुन्हा

सामना ऑनलाईन । मुंबई

अल्पवयीन पीडितेचं बलात्काऱ्यासोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा केलेला आरोप 3 पोलिसांना महागात पडणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने बुधवारी याची परवानगी दिली आहे. 2013 साली एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यात ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहीली होती. या प्रकरणी पीडित मुलगी आणि तिच्या वडीलांनी न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींना शिक्षा देण्यासोबतच यातील एका आरोपीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी याचिका पीडितेने केली होती.

पीडितेवर 5 जणांनी बलात्कार केला होता,ज्यामुळे ती गर्भवती राहिली होती. या नराधमांना शिक्षा व्हावी यासाठी मुलीने आणि तिच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली होती. यावेळी आंबोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे (सध्या आर्थीक गुन्हे शाखेत पोलीस निरिक्षक), तत्कालीन पोलीस निरीक्षक विवेक शेंडे (सध्या वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक) आणि पोलीस शिपाई जनिता भोसले यांनी पीडितेचं तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले असा आरोप या पीडितेने केला आहे. यामुळे हादरलेल्या पीडितेने आणि तिच्या वडिलांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

ज्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा होती त्यांनी अन्याय केल्याने पीडितेच्या वडिलांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. त्यापूर्वी बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी पीडितेची तक्रार ऐकून गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास होणार नाही या भीतीने पीडितेच्या वडिलांनी उच्च न्यायालयाकडे तपास दुसऱ्या पोलीस ठाण्याकडे सोपवावा असे आदेश दिले होते. यावर न्यायालयाने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. 2018 साली विशेष पोक्सो न्यायालयाकडे जबरदस्ती लग्न लावून देणाऱ्या 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधातही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

पीडीतेसोबत काय घडले होते?

फेब्रुवारी 2013 साली सकाळी 10 वाजता पीडिता तिच्या वडिलांसोबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. तिने शिंदे यांना घडलेला प्रकार सांगितला, यानंतर आरोपींना तिच्यासमोर हजर करण्यात आलं. यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या मुलीला एका खोलीमध्ये बसवून ठेवण्यात आलं. 5 वाजता तिला शेंडेंच्या केबिनमध्ये आणण्यात आलं तिथे तिच्यावर बलात्कार करणारा, त्याचे काका,आई,भाऊ आणि एक स्थानिक रहिवासी आधीच हजर होते. शेंडेंनी या पीडितेला बलात्काऱ्यासोबत लग्न कर, तुझ्या मुलाला वडीलांचे नाव मिळेल, तसेच तुझ्यासाठी एक झोपडी विकत घेऊन मुलाच्या पालन पोषणाचा खर्च केला जाईल असे आमीष दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर या मुलीवर सगळ्यांनी प्रचंड दबाव टाकला, यादबावामुळे मोडलेल्या मुलीने अखेर बलात्काऱ्यासोबत लग्नाला होकार दिला होता. या सगळ्याबाबत 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्तर प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयापुढे सादर केले असून हे सगळे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या पोलिसांना 10 जून रोजी न्यायलयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.