निर्दयतेचा कळस! पैसे न भरल्याने चिमुरडीचे ऑपरेशन थांबवले, पोट न शिवताच कुटुंबीयांकडे सोपवल्याने मृत्यू

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील खासगी रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे उपचारासाठी दाखल एका चिमुरडीचे ऑपरेशन कुटुंबीय पैसे भरू न शकल्याने थांबवण्यात आले. डॉक्टरांनी ऑपरेशन टेबलवरून पोट न शिवताच या चिमुरडीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यामुळे तिची तब्येत बिघडली आणि अखेर उपचारांअभावी तिचा मृत्यू झाला. यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताव व्यक्त केला जात आहे.

प्रयागराजमधील करेली भागात राहणाऱ्या ब्रह्मदीन मिश्रा या 3 वर्षीय मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. आई-वडिलांनी तिला प्रयागराजमधील एका प्रख्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे काही दिवसानंतर मुलीचे ऑपरेशन करण्यात आले. यानंतर आणखी एक ऑपरेशन झाले. या ऑपरेशनचे दीड लाख घेतल्यानंतर रुग्णालयाने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. मात्र कुटुंबीय पैसे न भरू शकल्याने रुग्णालयाने निर्दयतेचा कळस गाठत या चिमुरडीला ऑपरेशन टेबलवरून थेट कुटुंबीयांच्या हाती सोपवले, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिले.

निराश झालेल्या मिश्रा कुटुंबाने यानंतर अनेक रुग्णालयांचे उंबरे झिजवले. मात्र मुलीची तब्येत गंभीर असून ती वाचू शकत नाही असे म्हणत एकाही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. अखेर योग्य उपचारांच्या अभावी चिमुरडीचा मृत्यू झाला. यानंतर चिमुरडीच्या वडिलांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली असून ऑपरेशनचे टाके न टाकताच तिला आमच्याकडे सोपवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडियावर मदतीची याचना

दरम्यान, चिमुरडीच्या वडिलांनी सोशल मीडियाद्वारे आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता. तसेच मुलीच्या उपचारासाठी मदतीची याचनाही केली होती. या व्हिडीओमध्ये चिमुरडीच्या पोटावर टाके नसल्याचे स्पष्ट दिसत होते. आता चिमुरडीच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी या रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

घटनेचे गांभीर्य पाहून प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी तपासासाठी पथक बनवले आहे. चौकशीअंती जर कोणी दोषी आढळले तर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या