नाशिकमधील पावसामुळे गिरणा धरण भरू लागले; 24 तासांत 30 टक्के धरण भरले

779
khadakwasla dam water
खडकवासला धरणातून सोमवारी सकाळी १० वाजता ३४२४ क्युसेक्स लीटर पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे.

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, येथील धरणातील जलसाठा वाढल्याने येथून गिरणा धरणात पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. रविवारी सायंकाळी चनकापूर धरणातून 15 हजार 953 क्युसेक, पुनद धरणातून 6 हजार 929 क्युसेक, ठेगांडा धरणातून 19 हजार 710 क्युसेक, हरणबारी धरणातून 9 हजार 157 क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस.आर. पाटील, कार्यकारी अभियंता धर्मेंद्रपुमार बेहेरे यांनी दिली. वरच्या भागातील धरणातून पाण्याचा फ्लो सुरू असल्याने गिरणा धरणातील जलसाठय़ात चांगली वाढ होत आहे. सायंकाळी गिरणा धरणात 15 टक्के जलसाठा झाला होता. मृतसाठा धरून पाणीपातळी 5 हजार 830 दशलक्ष घन फूट इतकी झाली असून येत्या 24 तासांत धरणातील जलसाठा 30 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. रविवारी सकाळपासून शहरासह परिसरात संततधार सुरू होती.

गिरणा धरणात रविवारी सायंकाळपर्यंत 15.30 टक्के इतका जलसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असल्याने ठेगोंडा, चणकापूर, हरणबारी या धरणांतून मोठा विसर्ग सुरू असून धरणातील जलसाठ्य़ात वेगाने वाढ होत आहे. येत्या 24 तासांत गिरणा 30 टक्के भरणार आहे.

पांझरा नदीकाठावरील रहिवाशांचे स्थलांतर
अमळनेर : अक्कलपाडा धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्याने निम्न पांझरा (अक्कलपाडा) प्रकल्पातील रविवारी पाण्याची पातळी रविवारी 379.10 मी. झाली. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत आहे.

पाण्याचा विसर्ग 22 हजार क्युसेक्स होता. तो रात्री 40 हजार करण्यात आला. त्यामुळे रात्री 9.30 वाजता पांझरा नदीला पूर अलर्ट करण्यात आला. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी मुडी, बाह्मणे, भिलाली, शहापूर येथील नदीकाठावरील आदिवासी वस्ती हलवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वस्ती स्थलांतर करण्यात आले. अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लाटीपाडा, मालनगाव व जामखेडी हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून विसर्ग पांझरा नदीत सोडण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने व वरील धरणांच्या नदीत होणाऱया विसर्गामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. पाटबंधारे अभियंत्यांच्या संदर्भ पत्रान्वये उजव्या कालव्याक्दारे पाणी सोडण्याबाबत धुळे पाटबंधारे विभागास सुचित करण्यात आले आहे. रविवारी डाव्या कालव्याद्वारे खरीप हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती व पाणीपातळी पाहता अक्कलपाडा धरणाचे दार उघडण्यात आले आहे. पांझरा नदीवरील फरशी पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे. तसेच नदी दुथडी भरून वाहत असल्याने अमळनेर-सोनगीर बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या