कोचीजवळील कक्कनड येथील निवासी संकुलात राहणारे नागरिक दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे. यामध्ये मुलांसह सुमारे 300 नागरिकांचा समावेश आहे. कोचीतील या गंभीर प्रकाराची दखल घेत महापालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संकुलाचा पाणीपुरवठा बंद केला.
दरम्यान, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेची दखल घेतली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना परिसराची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘सोमवारी निवासी संकुलात राहणाऱ्या एका व्यक्तीने सरकारी हेल्पलाइनवर फोन करून अनेक लोक आजारी पडले असल्याची माहिती दिली. अलीकडच्या काळात शहरात दूषित पाणीपुरवठ्याची प्रकरणे समोर आली असून हजारो कुटुंबे या संकुलात राहत असल्याने ही बाब गंभीर आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य संरक्षण कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
निवासी संकुलाच्या फ्लॅटमधील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत तपासले जातील असेही त्या म्हणाल्या. बाधित व्यक्तींनी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असल्याने ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात आली नसावी. मात्र याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. आता पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी स्वत: ची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी नेहमीच उकळून वापरावे, अशी विनंतीही मंत्र्यांनी केली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी संकुलातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या चाचणीचे निदान अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे निदान होईपर्यंत कोणत्याही निकषावर येऊ शकत नाही, असे सांगण्यात आले.