पालिकेच्या 300 निवासी डॉक्टरांना 54 हजार विद्यावेतन, शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश

851

पालिकेच्या कूपर, भाभा आणि इतर रुग्णालयांतील 300 डॉक्टरांना आता 54 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. या निवासी डॉक्टरांना याआधी केवळ 14 हजार 800 रुपये विद्यावेतन मिळत होते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात राहणे त्यांना कठीण बनले होते. याची दखल घेत आज महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार पाठपुरावा करण्यात आला.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमडी, एमएस, डीएनबी डॉक्टर निवासी डॉक्टरांप्रमाणे कूपर आणि इतर 16 रुग्णालयांमध्ये 300 डॉक्टर निवासी डॉक्टर प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत. कोरोनाच्या प्रभावात तर या डॉक्टरांना दिवसरात्र मेहनत करून सेवा बजवावी लागत आहे. मात्र 2016 पासून स्पेशलायझेशनसाठी पालिकेच्या रुग्णालयात काम करणार्‍या या डॉक्टरांना केवळ 14 हजार 800 रुपये वेतन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सीपीएस निवासी डॉक्टरांना इतर इतर निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन द्यावे अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी तातडीने दखल घेऊन बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संबंधित निवासी डॉक्टरांना 54 हजार रुपये दरमहा विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिले असून दोन दिवसांत परिपत्रक काढून कार्यवाही होणार असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी सांगितले.

अखेर न्याय मिळाला!
पालिकेच्या रुग्णालयात निवासी डॉक्टर असणार्‍या एमडी, एमएस, डीएनबी डॉक्टरांच्या 54 हजारांच्या विद्यावेतनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा हजारांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय एमबीबीएस एक वर्ष ट्रेनिंग पिरीएडच्या डॉक्टरांना सहा हजारांवरून 50 हजार रुपये विद्यावेतन करण्यात आले आहे. सीपीएस (कॉलेज ऑफ फिजिशीयन) स्पेशलायझेशन करणार्‍या आणि कोरानाच्या काळात इतर सर्व डॉक्टरांच्या बरोबरीने काम करणार्‍या डॉक्टरांना 14 हजार 800 रुपये वेतन देण्यात येत होते. मात्र शिवसेनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आल्यामुळे खेड्यापाड्यातून उच्च शिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला असल्याचे असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर ऑफ कॉलेज फिजिशीयन अँड सर्जनचे डॉ. राजू झुरळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या