कश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्यावर दगडफेक करण्यासाठी ३०० व्हॉट्सअॅप ग्रुप

23
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीरमधील तरुणांना भडकवून हिंदुस्थानी सैन्यावर दगडफेक करण्यासाठी म्हणून फुटीरतावादी गटाने सुमारे ३०० व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ९० टक्के ग्रुप बंद करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित १० टक्के ग्रुप बंद करण्यासाठी तंत्रज्ञांची मदत घेण्यात येत आहे. तसेच असे ग्रुप तयार केल्यास त्याला त्वरित रोखण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात येत आहे.

हिंदुस्थान आणि सैन्याविरोधात कश्मीरमधील तरुणांना भडकवणारे जवळपास ३०० ग्रुप आम्ही शोधले. त्यानंतर या ग्रुपच्या अॅडमिनना बोलावण्यात आले. त्यांच्या योग्य संवाद साधून असे ग्रुप कश्मीरसह देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक असल्याचं समजावले. त्यानंतर ९० टक्के ग्रुप बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती हिंदुस्थानच्या लष्करी अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. गेल्या ३ आठवड्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले.

एखादी घटना घडली की ती वेगवेगळ्या पद्धतीने कश्मिरी जनतेसमोर व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केली जायची त्यामध्ये हिंदुस्थानविरोधी सुरू असायचा. त्यामुळे तणाव वाढायचा. त्यामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय चांगलाच कामी आला. इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने उद्रेक थांबला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले. तसेच ग्रुप अॅडमिनला समूपदेशन केल्याने अनेक गैरसमज दूर करता आले, असेही यावेळी सांगण्यात आले.

या आधी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली की त्या किंवा आजूबाजूच्या गावातील तरुण घटनास्थळावर जमायचे आणि दगडफेक करून सैन्याला त्रास द्यायेच. त्यांना हे सर्व निरोप सोशल मीडियावर दिले जायचे. मात्र इंटरनेट सेवा बंद ठेवल्यानंतर हे प्रकार बंद झाले. सैन्याला काम करताना गावकऱ्यांचा होणारा विरोध निवळला, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी यासंदर्भात सरकारपर्यंत आपल्या तक्रारी देखील पोहोचवल्याचेही सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या