अफगाणिस्तान – कंदहारमधील मशिदीत एकामागोमाग तीन बॉम्बस्फोट, 32 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासन आल्यापासून दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट, गोळीबार होत आहे. आज शुक्रवारीही कंदहारमधील इमाम बारगाह मशिदीमध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट झाले. नमाज अदा करताना झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला असून 53 लोक जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील स्थानिक न्यूज चॅनेल ‘टोलो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, कंदहारमधील इमाम बारगाह ही मशिद शिया लोकांची मशिद आहे. शुक्रवारी या मशिदीमध्ये लोक नमाद अदा करण्यासाठी जमा झाले होते. त्याचवेळी एकामागोएक तीन बॉम्बस्फोटांनी मशिद हादरली. बॉम्बस्फोटानंतर मशिदीमध्ये धावपळ उडाली.

बॉम्बस्फोटानंतर मशिदीमध्ये रक्तमांसाचा चिखल झाला होता. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला असून 53 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सईद कोस्ती यांनी दिली आहे. या बॉम्बस्फोटांनंतर तालिबानचे विशेष सुरक्षा पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहे.

याआधी गेल्या शुक्रवारी एका शिया मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मशिदीमध्ये शेकडो लोकं नमाद अदा करण्यासाठी आले असताना आत्मघातकी हल्ला करण्यात आला. इस्लामिक स्टेट खुरासानने या बॉम्बस्फोटोची जबाबदारी स्वीकारली होती.