धक्कादायक! हिंदुस्थानींचा 34 लाख कोटींचा ‘काळा पैसा’ विदेशात

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानींचा तब्बल 216.48 अब्ज डॉलर्स (15 लाख कोटी) ते 490 अब्ज डॉलर्सचा (34 लाख कोटी) ‘काळा पैसा’ विदेशात असल्याची धक्कादायक माहिती आहे. 1980 ते 2010 या 30 वर्षांत हा अब्जावधींचा बेहिशेबी पैसा विदेशात जमा झाल्याची आकडेवारी आज लोकसभेत मांडण्यात आली.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक पॉलिसी ऍण्ड फायनान्स (एनआयपीएफपी), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एनआयएफएम) आणि नॅशनल कॉन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) या तीन महत्वपूर्ण संस्थांनी ब्लॅक मनी (काळा पैसा) बाबत सखोल अभ्यास करून सर्वेक्षण केलेला अहवाल आज लोकसभेत मांडण्यात आला. अर्थविषयक स्टॅंडिंग कमिटीने हा अहवाल मांडला आहे. कमिटीचे चेअरमन, काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांनी सोळावी लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांकडे अहवाल दिला होता.

काय आहे अहवालात?
‘एनसीएईआर’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार 1980 ते 2010 या काळात हिंदुस्थानातून 384 अब्ज डॉलर्स ते 490 अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा विदेशात गुंतविण्यात आला. ‘एनआयएफएम’च्या सर्वेक्षणानुसार 1990 ते 2008 या कालावधीत 216.48 अब्ज डॉलर्स अर्थात 150236 लाख कोटी रुपयांचा ब्लॅकमनी विदेशात गुंतविला.

रियल इस्टेट, गुटखा, शिक्षणात ‘काळा पैसा’
ब्लॅक मनी अर्थात काळा पैसा सर्वांत जास्त निर्माण होणाऱया क्षेत्राची यादी या सर्वेक्षणात देण्यात आली आहे. यामध्ये रियल इस्टेट अर्थात बांधकाम क्षेत्र, मायनिंग, फार्मास्टिकल, पान मसाला, गुटखा, चित्रपट आणि शिक्षण क्षेत्राचा समावेश आहे.