युवासेनेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या सेट, नीट सराव परीक्षेसाठी ३४,७०१ विद्यार्थ्यांची नोंदणी

सामना प्रतिनिधी । मुंबई

बारावीनंतर इंजिनीयरिंग, फार्मसी, लॉ आणि मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सेट (SET), नीट (NEET), प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती कमी करण्याबरोबरच त्यांना पेपर सोडवण्याचा अनुभव मिळावा म्हणून युवासेनेच्या वतीने रविवारी १५ एप्रिल रोजी राज्यभर २११ सेंटरवर सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार या सराव परीक्षेला बसण्यासाठी तब्बल ३४,७०१ विद्यार्थ्यांनी युवा सेनेकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.

विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱया प्रवेश परीक्षांबाबत भीती असते. त्यामुळे ती दूर करण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी युवा सेना प्रत्येक वर्षी सराव परीक्षांचे आयोजन करते. त्यानुसार १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ या वेळेत ही सराव परीक्षा होणार आहे. त्यासाठी मुंबई आणि ठाणे जिह्यात ७२ सेंटर्स असून मराठवाड्यात ४७, पश्चिम महाराष्ट्रात ३९, उत्तर महाराष्ट्रात ३० व कोकणात ३० सेंटर्स असणार आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य झाले नाही त्यांना नजीकच्या सेंटरवर जाऊन परीक्षेस बसता येणार असल्याचे युवा सेनेने स्पष्ट केले आहे.

प्रश्नपत्रिका व मॉडेल सोल्यूशन सेट ऑनलाइन मिळणार
ज्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देण्यासाठी सेंटरवर उपस्थित राहाणे शक्य नाही त्यांच्यासाठी www.ys-cet.com या संकेतस्थळावर सर्व प्रश्नपत्रिका व ‘मॉडेल सोल्यूशन सेट’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना मॉडेल सोल्यूशन सेटचे वितरण करण्यात येणार आहे.